तृतीयपंथीयांना प्रवेश नाकारल्याप्रकरणी फिनिक्स माॅलची दिलगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 06:44 PM2018-03-18T18:44:44+5:302018-03-18T18:44:44+5:30
फिनिक्स माॅलमध्ये तृतीयपंथीयाची अडवणूक केल्याच्या घटनेप्रकरणी माॅलप्रशासनाने माध्यमांकडे दिलगीरी व्यक्त केली अाहे. मात्र जाेपर्यंत लेखी माफी मिळत नाही ताेपर्यंत लढा सुरुच ठेवण्यावर साेनाली ठाम अाहेत.
पुणे : फिनिक्स मॉलमध्ये तृतीयपंथीयांना प्रवेश न देण्यात आल्याच्या घटनेनंतर मॉल प्रशासनाने माध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र जोपर्यंत लेखी माफी मागून यापुढे कोणालाच जात, धर्म, कपडे, लिंग यांच्या आधारावर प्रवेश नाकारणार नाही असे मॉल प्रशासन स्पष्ट करणार नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू राहिल असे सोनाली दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
उच्चशिक्षित असलेल्या सोनाली दळवी या फिनिक्स मॉलमध्ये पाडव्याच्या खरेदीसाठी आपल्या मित्रासोबत गेल्या होत्या. त्यावेळी मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मॉल प्रशासनावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर आता मॉल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सुरक्षा तपासणीसाठी सोनाली यांना थांबवून ठेवण्यात आले होते, असे मॉल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, मॉल प्रशासन कुठल्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही असेही मॉल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना सोनाली दळवी म्हणाल्या, मला लेखी माफीनामा हवा आहे, तोही सर्वांसमोर. तोपर्यंत मी माझा लढा कायम ठेवणार आहे. यापुढे कोणालाही त्याच्या जात, धर्म, लिंग कशावरुनही अडवणूक करणार नाही असेही मॉल प्रशासनाने स्पष्ट करायला हवे. आज अनेक तृतीयपंथी हे माझ्यासारखे उच्च शिक्षित नाहीत. त्यांच्यासोबत असे घडू नये यासाठी मॉल प्रशासनाने जाहीर माफी मागावी.