फोन टॅपिंग : रश्मी शुक्लांना दणका, न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 06:24 AM2022-12-22T06:24:13+5:302022-12-22T06:24:36+5:30
बुधवारी क्लोजर रिपोर्टच फेटाळल्याने शुक्ला अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
पुणे : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांचा फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र, पुण्याच्या न्यायालयाने बुधवारी क्लोजर रिपोर्टच फेटाळल्याने शुक्ला अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
नेत्यांचे फोन टॅप करण्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. या काळात रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी असताना मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, एकनाथ खडसे यांचा समावेश होता.