तीन वर्षांपासून बेपत्ता असलेली व्यक्ती सापडली मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर; कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 09:34 AM2024-07-21T09:34:36+5:302024-07-21T09:36:40+5:30
तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या जाहिरातीवर दिसल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे.
Mukhyamantri Tirtha Darshan Yojana : राज्यातील सर्वधर्मीयांमधील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा घडवणारी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. या योजनेची सरकारकडून जाहिरातबाजी सुरु आहे. मात्र आता या योजनेच्या जाहीरातीबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर पाहिल्याने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.
महायुती सरकारने जेष्ठांसाठी तिर्थ दर्शन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडून जाहिरात करण्यात येत आहे. मात्र या योजनेच्या एका जाहिरातीवर चक्क तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो लावण्यात आला आहे. बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबियांना याबाबत माहिती मिळताच त्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे अशी विनंती बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबियांनी केली आहे.
आता तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो जाहिरातीवर दिसल्याचे चर्चांना उधाण आलं आहे. बेपत्ता वडिलांचे दर्शन घडवा अशी विनंती आता त्यांच्या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. जाहिरातीमध्ये दिसणारी व्यक्ती ही पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे आहेत. ज्ञानेश्वर तांबे हे गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सरकारला ज्ञानेश्वर तांबे हे नेमके कुठे सापडले असा सवाल कुटुंबियांना पडला आहे.
"ज्ञानेश्वर तांबे हे अनेकदा कित्येक महिने घरी येत नव्हते. मात्र मागील तीन वर्षापासून ते घरी आलेच नाहीत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार केली नाही. पण जाहिरातीवर फोटो पाहून आनंद झाला. ज्ञानेश्वर तांबे हे पाहुण्यांच्या घरी जायचे. महिनोंमहिने घरी यायचेच नाही. तसेच तीन वर्षांपूर्वी गेले होते. आम्हाला वाटलं की ते येतील परत, पण ते आले नाही. नंतर आम्ही आमच्या पाहुण्यांकडे त्यांच्याबद्दल बरीच चौकशी केली. मात्र कुणीही त्यांच्याजवळ आल्याची माहिती दिली नाही," असे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेच्या जाहिरातीमध्ये मला माझ्या वडिलांचा फोटो दिसून आल्याने आश्चर्याचा धक्का बसला. शासनाकडून मला अपेक्षा आहे की ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे त्यांचा अधिकाऱ्यांनी शोध घेऊन मुख्यमंत्र्यांनी माझ्या वडिलांचे दर्शन द्यावे, अशी माझी विनंती आहे, असे तांबे यांच्या मुलाने म्हटलं आहे.