‘सारथी’चा प्रताप; ‘शिवजयंती’ वक्तृत्व स्पर्धेच्या बॅनरवर संभाजी महाराजांचा फोटो, आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बदलला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 06:27 PM2022-02-09T18:27:29+5:302022-02-09T18:28:13+5:30
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) ‘शिवजयंती ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित केली आहे
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) ‘शिवजयंती ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित केली आहे. मात्र, यामध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याऐवजी छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो सारथीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतरही तातडीने त्यावर कार्यवाही न केल्याने मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्च्या आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनी तीव्र निषेध केला. तसेच आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर तो फोटो बदलण्यात आला आहे.
मराठा महासंघाचे अध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, सारथीच्या कारभार हा केवळ ऑनलाईन घरी बसून केला जात आहे. दिखाव्यासाठी कारभार सुरू आहे. केवळ गुगलच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या नावाने ऑनलाईन वकृत्व स्पर्धा आयोजित करून त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो टाकला आहे. तसेच ही अधिकृत जाहिरात सारथी संस्थेच्या संकेतस्थळावरून सगळीकडे वितरित करण्यात आली.
जाहिरात पाहिल्यानंतर सारथीचे कार्यकारी संचालक अशोक काकडे यांना या चुकीबद्दल कळविले. त्यावर मात्र काकडे यांनी मला गुगलचा एक फोटो पाठवून दिला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो शिवाजी महाराजांच्या नावानी लावलेला आहे, असे दाखविले. परंतु, अशोक काकडे यांना जर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील फरक कळत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा देऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे समजून घ्यावेत, अशी टीका आडेकर यांनी केली.
''मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्यांपैकी एक असलेली मागणी म्हणजे सारथी संस्था होय. या सारथीचा कारभार चुकीच्या व्यक्तींच्या हातात गेल्यामुळे आज मराठा समाजालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील फरक या कारभाऱ्यांमुळे होत नाहीये असे सचिन आडेकर (अध्यक्ष, मराठा महासंघ, पुणे) यांनी सांगितले.''
''आजची घटनेवरून सारथीचे अधिकारी झोपेत काम करतात का, असा प्रश्न पडत आहे. कारण या अधिकाऱ्यांना काही सांगायला गेल्यास ते काहीच ऐकून घेत नाही. हेकेखोरपणा करण्याच्या नादात आजची मोठी चूक घडली आहे. या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे संतोष शिंदे (प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड) म्हणाले आहेत.''