छायाचित्रातून छायाचित्रकाराचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समजतो : निपुण धर्माधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 05:09 PM2018-04-06T17:09:16+5:302018-04-06T17:09:16+5:30
‘पीअॅटपी’ हा छायाचित्रकारांचा २००६ साली सुरु झालेला अनौपचारिक ग्रुप असून, यामध्ये सात हजारांपेक्षा जास्त छायाचित्रकार जोडले गेले आहेत. हे सर्वजण मिळून दरवर्षी ‘दृष्टीकोन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करतात.
पुणे : चित्र किंवा छायाचित्रांना शब्दांची गरज नसते, हेच या कलेचे महत्व आहे. याशिवाय या कलेतून प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोनही आपल्याला समजतो, असे मत प्रसिध्द युवा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. फोटोग्राफर्स अॅट पुणे अर्थात पीअॅटपी यांच्या वतीने आयोजित ‘दृष्टिकोन २०१८’ या नवव्या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
‘प्राईम्स अँड झूम्स’चे संचालक अभिजित मुथा,‘निर्माण फ्रेम्स’च्या संचालिका सीमा लाहोटी, विद्या महामंडळाच्या माजी अध्यक्षा अश्विनी देशपांडे आणि ‘पीअॅटपी’ ग्रुपचे सदस्य या वेळी उपस्थित होते. ‘पीअॅटपी’ हा छायाचित्रकारांचा २००६ साली सुरु झालेला अनौपचारिक ग्रुप असून, यामध्ये सात हजारांपेक्षा जास्त छायाचित्रकार जोडले गेले आहेत. हे सर्वजण मिळून दरवर्षी ‘दृष्टीकोन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करतात. यावर्षी प्रदर्शनाचे नववे वर्ष असून, यामध्ये ७० छायाचित्रकारांनी काढलेल्या ९८ छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे ५ हजार छायाचित्रांमधून या ९८ छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. या प्रदर्शनात पोट्रेट्स, मॅक्रो, वाईल्डलाईफ, अॅबस्ट्रॅक्ट, स्ट्रीट फोटोग्राफी, लँडस्केप आदी वैविध्यपूर्ण आणि निवडक अशा छायाचित्रांचा समावेश आहे.
धर्माधिकारी म्हणाले की, या छायाचित्र प्रदर्शनातील छायाचित्रे ही वेगळी आहेत. अगदी पुणे शहरापासून मोरोक्को पर्यंतची अनेकविध छायाचित्रे पाहण्याची संधी या प्रदर्शनात मला मिळाली. चित्रपट आणि नाटकाच्या कथा लिहिल्यानंतर त्याचा ‘अँगल’ बरोबर आहे की नाही यावर मी अनेकदा विचार करतो. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर फोटोग्राफर्सचा हाच अँगल मलाही समजला. यानंतर या छायाचित्रकारांकडून मी माझ्या पटकथांमधील अँगल समजून घेण्यास उत्सुक राहीन.
या प्रदर्शनातून होणा-या विक्रीमधून विद्या महामंडळ या कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जात असलेल्या संस्थेला मदत करण्यात येते. याच मदतीतून या विद्यार्थ्यांचा वर्षाचा खर्च संस्थेमार्फत भागविला जातो. हे प्रदर्शन रविवार (दि. ८ एप्रिल) पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत घोले रस्ता, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे सुरू राहणार आहे.