Pune Crime | भेटण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचे फोटो केले व्हायरल; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:44 AM2023-05-20T11:44:56+5:302023-05-20T11:45:18+5:30
याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवला आहे...
पुणे : सोशल मीडियावर बोलण्यास नकार दिला म्हणून आरोपीने अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवला आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी विशाल तळेकर (रा. पेठ, पुणे) याने पीडितेशी सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर तिला सेनापती बापट रोडवरील चतुःशृंगी मंदिरात भेटायला बोलावले. मंदिरात दोघांची भेट होऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून फोटो काढले. भेट झाल्यांनतर मुलीने भेटण्यास नकार दिल्याने तळेकरने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून दोघांचे फोटो व्हायरल केले. तसेच तिला अश्लील मेसेज पाठवून धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर वेगवेगळ्या मोबाइलवरून तुमची मुलगी चांगली नाही, ती नवनवीन मुलांना फसवते असा बदनामीकारक मजकूर पाठवला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक चिंतामण अंकुश तपास करत आहेत.
सोशल मीडियाचा वापर करताना पालकांनी आपल्या पाल्याच्या कृतींकडे लक्ष दिले पाहिजे. मुख्यत्वे पाल्य जर अल्पवयीन असेल, तर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून ते अशा प्रकारच्या फसवणुकींना बळी पडणार नाही.
- चिंतामण अंकुश, सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा.