पितृसत्ताक जातीयवाद्यांचा विराेध पत्करून फुले दाम्पत्याने सुरू केली शाळा - सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 12:19 PM2023-12-10T12:19:23+5:302023-12-10T12:19:51+5:30
आजची युवा पिढी दयाळू, सहानुभूती असणारी तसेच गंभीरपणे विचार करणारी, समस्यांबाबत बाेलणारी आणि इतरांना शिक्षित करणारी आहे
पुणे: सात वर्षांची मुलगी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत समाजमाध्यमांवर बाेलते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्ते सुधारण्यासाठी कृती करण्यास सांगते. या कृतीने माझे मन मला पुण्यात १८४८ साली सुरू झालेल्या मुलींच्या पहिल्या शाळेकडे घेऊन जाते. पितृसत्ताक जातीयवाद्यांचा विराेध असतानाही महात्मा जाेतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी सर्व जाती-धर्मातील लाेकांना शिक्षण मिळावे यासाठी निर्धाराने काम केले, असे प्रतिपादन सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी केले.
मुलींना शिकविण्यासाठी सावित्रीबाई फुले शाळेत जात असत तेव्हा त्या दुसरी साडी जवळ ठेवत असत. कारण मुलींना त्या शिकवतात म्हणून रस्त्यात गावकरी त्यांच्या अंगावर कचरा फेकायचे. समाजाला सुशिक्षित करण्याचा १८४८ ते २०२३ चा प्रवास प्रचंड संघर्ष, प्रगती आणि नि:स्वार्थ लाेकांच्या कार्याचा आहे, असेही ते म्हणाले.
सिंबायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड) विद्यापीठाच्या २० व्या पदवी प्रदान साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार, प्र-कुलपती डॉ.विद्या येरवडेकर, विद्यापीठाचे प्रो-होस्ट डॉ.राजीव येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ८६ विद्यार्थ्यांना पीएच.डी, १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तसेच ८ हजार ५७९ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
दुसऱ्यांचे ऐकून न घेणे ही माेठी समस्या
आपण केवळ स्वत:चे ऐकत असताे, दुसऱ्याचे न ऐकणे ही आपल्या समाजाची खूप माेठी समस्या आहे. तुमच्याकडे याेग्य उत्तरे नसतील तरीही इतरांना ऐकून घेतल्यास सभाेवतालच्या जगाची नवीन समज आपल्याला मिळत असते, असेही मत सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले...
- आजची युवा पिढी दयाळू, सहानुभूती असणारी तसेच गंभीरपणे विचार करणारी आहे. समस्यांबाबत बाेलणारी आणि इतरांना शिक्षित करणारी आहे.
- आयुष्यात यश मिळविण्यासाठी मेहनत घेण्यासह विद्यार्थ्यांनी त्यांना याेग्य वाटते ते करावे. स्वत्त्वाची जाणीव ठेवा; पण स्वत:बद्दल कठाेर हाेऊ नका. सभाेवतालच्या लाेकांबद्दल ममत्वभाव ठेवा.
- तुम्ही जी पदवी घेतली आहे, त्याबाहेरही करिअरची संधी शाेधता येईल. करिअर निवडणे आता गुंतागुंतीचे राहिले नाही. युवकांनी नावीन्यपूर्ण, कल्पक आणि धाडसी निर्णय घ्यावे.
- नेहमीची वाट साेडून ज्या वाटेवर पूर्वी काेणी गेले नाही असे नवीन आणि अज्ञात मार्ग शाेधा. अपयशाला न घाबरता भिडले पाहिजे.
- लाेकप्रियता आणि वैयक्तिक प्रगती यावर यशाचे माेजमाप करू नका. उच्च ध्येयासक्ती, देशसेवा करणे आवश्यक आहे.
- ग्राहकांना मदत करणे, कामाच्या ठिकाणी दर्जेदार आणि उत्तम वातावरण निर्मिती, कनिष्ठांना मार्गदर्शन करण्यासह भेदभाव दूर करीत सर्वसमावेशक समुदाय निर्मिती करणे गरजेचे आहे.