पेशवे पार्कातली ‘फुलराणी’ ६३ वर्षांची ; तिचे उद्घाटन करणारी ‘फुलराणी’ ६८ वर्षांची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 02:32 PM2019-04-08T14:32:25+5:302019-04-08T14:35:59+5:30

१९५६ मध्ये सुरु झालेल्या या फुलराणीचे उद्घाटन त्यावेळी पाच वर्षांच्या चिमुकलीच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हाची ती चिमुकली होती वसुंधरा डांगे...

'Phulrani' is 63 years old in Peshwa Park ; Her Excellency 'Fulrani' is 68 years old | पेशवे पार्कातली ‘फुलराणी’ ६३ वर्षांची ; तिचे उद्घाटन करणारी ‘फुलराणी’ ६८ वर्षांची

पेशवे पार्कातली ‘फुलराणी’ ६३ वर्षांची ; तिचे उद्घाटन करणारी ‘फुलराणी’ ६८ वर्षांची

Next
ठळक मुद्दे वसुंधरा डांगे आणि सुहास शिरवळकर यांच्या विवाहानंतर दोन वर्षांनी पेशवे पार्कातली ‘फुलराणी’ पंचविशीची झाली.

- अतुल चिंचली
लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : पुणेकरांच्या सहा-सात पिढ्यांचे रंजन करणारी पेशवे पार्कातली फुलराणी ८ एप्रिलला ६३ वर्षांची होत आहे. पुर्वीच्या पेशवे उद्यानातल्या गर्द झाडीतून वाघ, सिंह, उंट, घोडा अशा अनेक प्राण्यांच्या सानिध्यातून धावणारी फुलराणी बाळगोपाळांसाठी आजही आनंदाची पर्वणी ठरते आहे. सन १९५६ मध्ये सुरु झालेल्या या फुलराणीचे उद्घाटन त्यावेळी पाच वर्षांच्या चिमुकलीच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हाची ती चिमुकली होती वसुंधरा डांगे. आता त्या सुगंधा सुहास शिरवळकर आहेत. फुलराणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डांगे उर्फ शिरवळकर यांना तेव्हाच्या मजेदार आठवणी ‘लोकमत’ला सांगितल्या.


   पेशवे उद्यानातल्या फुलराणीचे उदघाटन ८ एप्रिल १९५६ ला पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील तेव्हाची विद्यार्थिनी वसुंधरा डांगे हिच्या हस्ते झाले. इंजिन आणि दोन डबे अशी ‘फुलराणी’ची रचना होती. या रेल्वेसाठी दोन फलाट, तिकीट विक्रीची खिडकी, तिकीट तपासनीस, सिग्नल अशी सारी व्यवस्था उभारण्यात आली होती. लहानग्यांच्या करमणुकीसाठी उद्यानात चालविल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये पुण्यातली ‘फुलराणी’ देशातली सर्वात जुनी रेल्वे आहे, हे विशेष. 
      वसुंधरा डांगे त्यावेळी रविवार पेठेतील जुनी भाजी अळी येथे वास्तव्यास होत्या. पूर्व प्राथमिक शाळेत शिकत होत्या. त्या सांगतात, की ५६ मधले पेशवे उद्यान  हिरव्यागार झाडाझुडुपांनी गच्च भरलेले आणि प्राणी-पक्ष्यांनी भरलेले उद्यान होते. या उद्यानात मुलांसाठी ‘फुलराणी’ धावणार ही विलक्षण बाब होती. फुलराणीचे उदघाटन एक लहान मुलीच्या हस्ते करण्याची पुणे महानगरपालिकेची इच्छा होती. महापालिकेचे अधिकारी पूर्व प्राथमिक शाळेत आल्यानंतर बालवाडीत शिकणाऱ्या वसुंधरेची म्हणजे माझी निवड करण्यात आली. 
           वसुुंधरा सांगत होत्या, ‘‘माझी आई विजयालक्ष्मी गृहीणी होती आणि वडिल कमलाकर ‘एसटी’त कार्यरत होते. माझे आजोबा काशीनाथ डांगे हे ख्यातनाम साहित्यिक आणि इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार यांच्याकडे लेखनिक म्हणून काम करीत. ‘फुलराणी’च्या उदघाटनानंतर पोतदार यांनी मलाही ‘फुलराणी’ याच नावाने हाक मारण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ‘फुलराणी’ हे नाव मला मिळाले ते आजतागाायत माझ्यासोबत आहे.’’
     पुढे प्रसिद्ध झालेले वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर पूर्वी रविवार पेठेतल्या लोणार आळीत तेव्हा वसुंधरा डांगे यांच्या घराजवळच राहात. वसुंधरा आणि सुहास यांचा प्रेमविवाह झाला. विवाह होण्याआधी सुहास शिरवळकर लेखक नव्हते. शिरवळकरांच्या घरी गेल्यानंतर जेव्हा सगळ्यांना समजले, की ‘फुलराणी’चे उद्घाटन वसुंधरेच्या हस्ते झाले आहे, तेव्हापासून सासरीदेखील वसुंधरा यांना ‘फुलराणी’च म्हटले जाऊ लागले. 

      वसुंधरा डांगे आणि सुहास शिरवळकर यांच्या विवाहानंतर दोन वर्षांनी पेशवे पार्कातली ‘फुलराणी’ पंचविशीची झाली. त्यावेळी महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी पुन्हा वसुंधरा यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पुण्यातले ज्येष्ठ पत्रकार वरूणराज भिडे यांनी त्यासाठी मदत केली. त्यावेळी वसुंधरा-सुहास या दाम्पत्याचा मुलगा ‘सम्राट’ हे दोन वर्षांचा झाला होता. त्यामुळे या दोन वर्षांच्या सम्राटच्या हस्ते ‘फुलराणी’चा रौप्य महोत्सव म्हणजेच पंचविसावा वाढदिवस साजरा करण्यात आला. ‘फुलराणी’चा पन्नासावा वाढदिवस वसुंधरा-सुहास यांचा दुसरा मुलगा प्रबोध शिरवळकर यांच्या आर्या या मुलीच्या हस्ते झाला.
................................................................................................... 

आनंद फुलवत राहील ‘फुलराणी’
रहस्यकथा आणि कादंबरी लेखनाच्या माध्यमातून मराठी वाचकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या सुहास शिरवळकर यांची तीनशे पुस्तके वाचकप्रिय आहेत.  शिरवळकर यांच्याशी प्रेमविवाह केलेल्या वसुंधरा डांगे यांचे पेशवे उद्यानातल्या ‘फुलराणी’शी जडलेले नाते शिरवळकरांच्याही घराशी जोडले गेले. वसुंधरा डांगे-शिरवळकर सांगतात, की पेशवे उद्यान हे पुण्याचे अलौकिक वैभव आहे. पूर्वी या उद्यानात प्राणी संग्रहालय होते. हत्तीचीही सवारी येथे मुलांना करता यायची. त्यावेळी ‘फुलराणी’, तिचे डिझेलवरचे जुने इंजिन, बंद दोन डबे हा अतिव आकर्षणाचा भाग होता. सुरवातीला दहा वर्षांच्या आतील मुलांनाच ‘फुलराणी’त बसता यायचे, नंतर मात्र मुलांसोबत मोठ्या पुणेकरांनाही या सफरीचा आनंद लुटता येऊ लागला. आताची ‘फुलराणी’ सौर ऊर्जेवर चालते, तिचे डबेही आता खुले केले आहेत. ही ‘फुलराणी’ नेहमी अशीच आनंदात धावत राहील. अनेक चिमुकल्यांच्या आयुष्यात मजेचे क्षण निर्माण करत राहील.
                  ------(समाप्त)------

Web Title: 'Phulrani' is 63 years old in Peshwa Park ; Her Excellency 'Fulrani' is 68 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे