पश्चिम घाटाच्या पठारावर फुलतेय दुसरे ‘कास’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 01:11 AM2018-09-12T01:11:17+5:302018-09-12T01:12:03+5:30
अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, धुक्याचे लोट व गार वारा अशा वातावरणात पश्चिम घाटाच्या पठारावर सध्या फुलोत्सव भरला आहे.
भीमाशंकर : अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, धुक्याचे लोट व गार वारा अशा वातावरणात पश्चिम घाटाच्या पठारावर सध्या फुलोत्सव भरला आहे. साताºयाजवळील कास पठार जसे फुलांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे भीमाशंकर, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, भंडारा या भागात असलेल्या पठारांवरदेखील रंगीबेरंगी फुलांनी माळ भरून गेले आहेत. कास पठारावर जायला जरी जमले नाही, तरी ही निरनिराळी फुले पाहण्यासाठी पश्चिम घाटातील पठारांना जरून भेट द्या.
पश्चिम किनारपट्टीला लागून पश्चिम घाट पसरला आहे. युनेस्कोने जागतिक जैववैविध्याचा वारसा म्हणून हे स्थळ सन २०१२मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. यामध्ये उत्तर-दक्षिण सुमारे १,६०० किलोमीटर पसरलेल्या या रांगेला महाराष्ट्रात सह्याद्री म्हणतात. या पश्चिम घाटात वनस्पतींच्या जवळपास ७,५०० प्रजाती आहेत व या पर्वतरांगांमध्ये अनेक पठारे आहे. यातील सह्याद्रीची पठारे ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या पठारांवर १५० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती बघायला मिळतात व या प्रजाती प्रामुख्याने गवत वर्गात मोडतात. कास पठार हे त्यातील एक प्रसिद्ध ठिकाण. येथे अतिशय आगळीवेगळी फुले पाहावयास मिळतात. कास पठाराप्रमाणेच अनेक छोटी-मोठी पठारे, कडेकपारी, घाटवाटा सह्याद्रीमध्ये आहेत. खेड, आंबेगाव, जुन्नरबरोबरच नगर जिल्ह्यातील अकोले, भंडाºयापर्यंत पसरलेल्या सह्याद्रीमध्ये कासप्रमाणेच फुलोत्सव पाहायला मिळतो.
सह्याद्रीमध्ये हळूहळू फुले बहरू लागली असून, छोट्यामोठ्या पठारांबरोबरच पायवाटा, भातखचरांचे बांध, रस्त्यांच्या कडासुद्धा विविधरंगी फुलांनी सजल्या आहेत. ही फुले अतिशय नाजूक, हळवी, हलकी, छोटीशी, चिमुरडी असली तरी सुंदर दिसतात.
यातील सोनकी, तेरडा, कारवी, भारंगी, खरबुटी, कळलावी, हाळिंद, खुरपापणी, कवळा, खांतुडी, नीलकंठ, गेंद, बरका, रानआले, रानहळद, चिचूरकांदा, पंद, चिचुरडी, जांभळी मंजिरी, हिरवी निसुर्डी, धाकटा अडुळसा, कोळिता, ढालतेरडा, पानतेरडा, वेलमूग, दीपकाडी, नरवी अमरी, काटेरिंगणी, अबोलिमा, कुली, खरचुडी, कंदील फूल अशा विविध फुलांचा फुलोत्सव भरला आहे. हा निसर्गाचा ठेवा पाहायचा असेल, तर पश्चिम घाटातील पठारे, डोंगर, पायवाटांकडे या. खूप सारा फुलोत्सव दिसले.
या फुलांमधून येणाºया फळांचा तसेच वेलींना खाली जमिनीत
असलेल्या कंदमुळांचा अतिशय औषधी उपयोग आहे. खरबुटी, हाळिंदसारखा फूलवेलीला जमिनीत कंदमूळ असते. हे दमा व
शुगर आजारांवर गुणकारी मानले जाते. कळलावी या फुलाच्या वेलीचा उपयोग पूर्वी प्रसूतीच्या कळा येण्यासाठी केला जाई; म्हणून त्याला हे नाव पडले. लाल ज्वालांसारखी ही फुले दिसत असल्यामुळे त्यांना ‘अग्निशिखा’देखील म्हणतात. भारंगीची फुले गुच्छासारखी दिसतात व त्यांचा रंग बहारदार असल्यामुळे त्याला ‘भारंग’ नाव पडले आहे. भारंगीच्या कोवळ्या निळसर फुलांची भाजी करून खाल्ली जाते. पोटदुखीच्या विकाराला ही फुले औषधी समजली जातात.