वडिलांच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, Video व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 02:23 PM2022-03-31T14:23:02+5:302022-03-31T14:30:45+5:30
४० वर्षाच्या महिलेची फिर्याद...
पुणे : वडिलांच्या मित्राबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून त्याने साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने रो हाऊस जबरदस्तीने विकायला भाग पाडला. त्याचे आलेले पैसे हडप करुन महिलेचे शारीरीक, मानसिक आणि आर्थिक शोषण करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी फुलेनगर येथे राहणाऱ्या एका ४० वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमानतळ पोलिसांनी पुरुषोत्तम लाल बुटानी (रा. खेसे पार्क, लोहगाव), वासुदेव पाटील (रा. खेसेपार्क, लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१२ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बुटानी हा फिर्यादी यांच्या वडिलांचा मित्र आहे. त्याचे व फिर्यादी यांचे २०१२ पासून प्रेमसंबंध होते. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. बुटानी याने फिर्यादी यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना लोहगाव, बाणेर, वाघोली येथील वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जाऊन त्यांच्याबरोबर शरीरसंबंध निर्माण केले. वासुदेव पाटील याने या दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.
दोघांनी फिर्यादी यांना त्यांच्या नावावर असलेला रो हाऊस विकण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना एक दुकान व फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले. मात्र, याला त्यांनी विरोध दर्शविल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रो हाऊसच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी परस्पर रो हाऊस विकला. त्यांचे काहीही पैसे फिर्यादीला दिले नाही. दुकान, फ्लॅटही न दिल्याने त्यांना आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. फिर्यादी यांचे शारीरीक, मानसिक, आर्थिक शोषण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.