भौतिकशास्त्र : व्यावसायिक संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:38+5:302021-04-22T04:09:38+5:30
भौतिकशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. (बॅचलर ऑफ सायन्स) ही पदवी मिळवता येते. तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्राबरोबर गणित, रसायनशास्त्र, ...
भौतिकशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. (बॅचलर ऑफ सायन्स) ही पदवी मिळवता येते. तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्राबरोबर गणित, रसायनशास्त्र, संख्याशास्त्र हे विषयही शिकण्याची संधी असते. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे. भौतिकशास्त्राचे उपयोजन आता जीवशास्त्र, संगणकशास्त्र आणि व्यवस्थापन अशा विषयातही होऊ लागले आहे. सुदैवाने आता पदवीपूर्व स्तरावर निवडीवर आधारित श्रेयांक पद्धत राबवली जात आहे. यात विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असते. भौतिकशास्त्र विषय घेऊन बी.एस्सी. झाल्यानंतर जर जैवभौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर ते शक्य आहे. अशा वेळी जीवशास्त्र हा विषय बी.एस्सी. करताना निवडल्यास फायदा होईल. तसेच स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार असेल तर इतिहास अथवा भाषा विषय निवडता येईल.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *भौतिकशास्त्राचे शिक्षण*
भौतिकशास्त्र विषयात बी.एस्सी.नंतर अनेक संधी उपलब्ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या राज्य विद्यापीठामध्ये या विषयात एम. एससी या दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. या विषयात पदव्युत्तर पदवी घेताना अनेक विषय अभ्यासता येतात. त्यात सैद्धांतिक (थेओरेटीकल) भौतिकी, जैवभौतिकशास्त्र, अवकाशशास्त्र, खगोल भौतिकी, अजांशी (नॅनो) तंत्रज्ञान यांचा समावेश असतो. याशिवाय भारतीय विज्ञान संस्था बंगलोर, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई या संस्थांमध्ये प्रवेश परीक्षेद्वारे एम.एस्सी आणि पीएच.डी.साठी एकत्रित अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.
एम.एस्सी.नंतर संशोधन करायचे असेल तर यूजीसी सीएसआरआयची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास संशोधनासाठी भारतातील विद्या पांडे आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये संशोधन करता येते. त्यासाठी महीना सोळा हजार रुपये स्टायपेंडही मिळतो. याशिवाय भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सीएसआरआय, संरक्षण भिन्नता आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांच्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये संशोधनाची त्याचप्रमाणे नोकऱ्यांची संधी उपलब्ध असते.
बी.एस्सी.नंतर भौतिकशास्त्राव्यतिरिक्त जैवतंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनीक्स सायन्स आणि उपकरणशास्त्र या विषयात एम.एससी करता येते. त्यासाठी प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. बी.एससी नंतर बी.एड करून माध्यमिक शिक्षक तर एम.एस्सी.नंतर बी.एड करून कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक होता येते. वरीष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची नोकरी मिळवण्यासाठी नेट- सेट, पीएचडी पदवी आवश्यक आहे. बी.एस्सी.नंतर अनेक उद्योगांमध्ये प्रशिक्षणार्थी या पदावर भौतिकशास्त्र विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाते. यात आयबीएम, जीई, बजाज, टाटा आणि इतर कंपन्यांचा समावेश होतो.
सध्याचे युग हे आंतरविद्याशाखीय उपयोजनांचे (अॅप्लिकेशन) आहे. त्यामुळे भौतिकशास्त्राव्यतिरिक्त इतर अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. भौतिकशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेताना गणित आणि संगणकशास्त्र विषय शिकवले जातात. या विषयांच्या आधारे भौतिकशास्त्राचे विद्यार्थी संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चांगले करीअर करीत आहेत. शिवाय संकेतस्थळांची निर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार या स्वरूपात व्यवसाय करीत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रारूप निर्मिती (मॉडेलिंग ॲंड सिम्युलेशन) आणि मशीन लर्निंग ही क्षेत्रही भौतिकशास्त्रातील पदवीधरांसाठी खुली आहेत. शिवाय लेबर अभियंता, ऑप्टिकल अभियंता, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टीम (प्रणाली) विश्लेषक अशी कामे तो करू शकतो.
अलीकडच्या काळात वैद्यकशास्त्रामध्ये निदान आणि उपचारासाठी आधुनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या उपकरणांची देखभाल, प्रमाणीकरण आणि उपयोगाचे निमंत्रक वैद्यक भौतिकी (मेडिकल फिजिसिस्ट) करतो. या पदावर काम करण्यासाठी डिप्लोमा इन रेडिएशन फिजीक्स हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. हा अभ्यासक्रम भाभा अणु संशोधन केंद्रातर्फे चालविण्यात येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएससी भौतिकशास्त्र ही पदवी आवश्यक असते. प्रवेश परीक्षेमार्फत प्रवेश देण्यात येणा-या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्यास स्टायपेंड मिळतो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या रुग्णालयात ज्या ठिकाणी सीटीस्कॅन, एमआरआय, कोबाल्ट मशीन, अल्ट्रा साऊंड अशी आधुनिक उपकरणे असतात. तिथे नोकरीची आणि चांगल्या पगाराची हमी आहे. परदेशातही अशा विद्यार्थ्यांना नोकरीची संधी असते.
भौतिकशास्त्र हा विषय ज्या क्षमता निर्माण करतो, त्यामुळे हे शक्य होते. मात्र, हा विषय निवडताना काही बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भौतिकशास्त्र हा विषय तुम्हाला मनापासून आवडायला हवा. त्यासाठी तुमची मनोधारणा ही चिकित्सक, तर्कशुद्ध आणि गणितीय नेमकेपणा आवडणारी असावी. असे असेल तर हा विषय तुम्हाला आवडू लागेल. त्यात तुम्ही प्रावीण्य मिळवून त्याचे उपयोजन करू शकाल. त्यामुळे जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल यात मुळीच शंका नाही.
- डॉ. पंडित विद्यासागर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ