यवतमध्ये पोलीस निरीक्षकावर जमावाची दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:52 PM2018-08-03T14:52:20+5:302018-08-03T14:53:22+5:30
यवत येथील धायगुडवाडी-बोरीपार्धी येथेदोन गटात झालेल्या भांडणात हस्तक्षेप कारण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली.
यवत : महिला आणि एका पुरुषामध्ये झालेल्या भांडणामधून दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह पोलिसांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर असे जखमी निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी जमावाविरुद्ध एका पोलीस कर्मचा-याने फिर्याद दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवत येथील धायगुडवाडी-बोरीपार्धी येथे एका महिलेची आणि एका पुरुषाची भांडणे झाली होती. यामधून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. तणाव वाढत चालल्याने पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये म्हणून हस्तक्षेप करायला सुरुवात केली. दोन्ही गटांच्या जमावाला पांगवित असताना एका जमावातील काही तरुणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. यातील काही दगड निरीक्षक बंडगर यांना लागले. त्यांच्या चेह-याला दगड लागल्याने जखमा झाल्या आहेत.