आयटीनगरीतही पोहचले संपाचे लोण
By Admin | Published: June 3, 2017 02:26 AM2017-06-03T02:26:11+5:302017-06-03T02:26:11+5:30
राज्यातील शेतकरी संपावर गेला असून, आज त्याचा दुसरा दिवस आहे. या संपाची दाहकता आता जाणवू लागली असून शहरालगतच्या
हिंजवडी : राज्यातील शेतकरी संपावर गेला असून, आज त्याचा दुसरा दिवस आहे. या संपाची दाहकता आता जाणवू लागली असून शहरालगतच्या परिसरात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. शेतकऱ्यांनी या संपला पाठिंबा दिला असून, सोशल मीडियावर सध्या संपला साथ देणाऱ्या अनेक पोस्ट टाकण्यात येत आहेत. परिसरात काही भाजीविक्रेते भाववाढ करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातून शहराला मोठ्या प्रमाणात भाजीपाला पुरवला जात असतो. संपामुळे या परिसरातूनही भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे.
२ हिंजवडी परिसरात मनमानी पद्धतीने भाज्यांच्या किमती भाजीवाले ठरवत आहेत. अनेकदा सडलेला भाजीपाला विकला जातो, हिंजवडी चौकात बसणारे भाजीविक्रेते यामध्ये आघाडीवर आहेत. शेतकरी वर्गात मात्र या संपाबाबत कमालीची उत्सुकता आहे. सरकारच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष असून, यासंबंधी सर्व बातम्यांवर शेतकरी लक्ष ठेवून आहेत. खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीस वेग आला असून, त्याची तयारी शेतकरी करीत आहेत. परंतु या संपाकडेही शेतकरी ओढला जात आहे.
३राज्यातील इतर भागात दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकून देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले; परंतु परिसरात असे प्रकार घडले नाहीत. परंतु शेतकऱ्यांचे या संपाला समर्थन असून, पाठिंबा देखील आहे. अनेक शेतकऱ्यांशी या वेळी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, शेती मशागतीच्या कामास सध्या कमी कालावधी राहिला आहे. शेतकरी संपात सहभाग म्हणून आपला शेतमाल बाजारात पाठवत नाही. तर पुढील काळात आषाढी वारी देखील सुरू होणार असून, वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी असतो. यामुळे शेतीच्या कामात अधिक खंड पडू नये यासाठी रस्त्यावर उतरून संपात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.
सोशल मीडियावर वाढता प्रतिसाद
मागील काळातील सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, तसेच फडणवीस सरकारदेखील कर्जमाफी करताना दिसत नाही. यामुळे शेतकरी थेट संपावर बसला आहे. आजच्या काळात यावर सोशल मीडियावर चर्चा झाली नाही तर नवलच..... आज संपाचा दुसरा दिवस असल्यामुळे आणि विविध वाहिन्यांवर दोन दिवसांपासून यावर चर्चा सुरु असल्याने अनेक सोशल मीडिया प्रेमींनी या संपला आपला पाठिंबा दर्शवला. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपचे स्टेटस स्वयंस्फूर्तीने बदलले. शेतकरी, शेतकऱ्यांची मुले यांनी यासाठी काही दिवस आधी ाासूनच पोस्ट टाकून वातावरण निर्मिती केली होती. फेसबुकवरदेखील अनेक विचारवंतांनी आपली मते मंडली सकारात्मक-नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने मिळालेल्या पोस्टला आज मात्र शेतकरी समर्थकांनी जोरदार हल्ला चढवला.
दूध शितकरण केंद्रावर शुकशुकाट
कामशेत : नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ मर्यादित दूध शितकरण केंद्रावर शुक्रवारी सकाळपासूनच शुकशुकाट होता. या केंद्रावर नाणे, अंदर, पवन मावळासह आजूबाजूच्या गावांमधील सुमारे दोनशे शेतकरी, तीस संस्था व २८ दूध डेअरी यांचे सुमारे सहा ते आठ हजार लिटर दूध संकलित होत असते. पण, राज्यातील शेतकरी संपावर गेल्याने हे दूध शितकरण केंद्र सध्या बंद झाले आहे. नेहमीच वाहन व शेतकऱ्यांची वर्दळ असणाऱ्या या केंद्रावर शुकशुकाट होता. दूध शितकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी बसून होते. दूध केंद्रावर दूध घेऊन येताना संतप्त आंदोलनकर्त्यांनी दुधाचे नुकसान करू नये किंवा इतर अनुचित प्रकार घडू नये. केंद्रावर दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्रावर दूध न आणता किंवा फेकून न देता घरीच दुधाचे विविध पदार्थ बनवावे व ते आपल्या मुलाबाळांना खायला घालावे, असे आवाहन दूध संघाचे चेअरमन बाळासाहेब नेवाळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
बोपखेलमध्ये भाजी मंडई बंद
बोपखेल : येथील भाजी मंडई सकाळपासूनच बंद होती. त्यामुळे येथील गृहिनींना भाजी पाल्यासाठी वाट पहावी लागली. गणेशनगर भागातील मंडई सकाळपासून बंद होती. कारण मार्केटला भाजीपाला नसल्याने भाजी विक्रेते रिकाम्या हातांनी आले व काही ठिकाणी भाजीपाला उपलब्ध होता. परंतु, दर अव्वाच्या सव्वा असल्याने भाजी विक्रेत्यांनी मंडई बंद ठेवनेच पसंत केले. मार्केटमध्ये भाजीपाला उपलब्ध नसल्याने आम्ही आज मंडई लावू शकलो नाही. त्यामुळे आमचेही नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे आम्हाला वाटते़ नाहीतर सामान्य जनतेला उपाशी रहावे लागेल असे भाजी विक्रेते संतोष कंधारे यांनी सांगितले. भाजीपाला आणण्यासाठी चऱ्होली, चाकण मार्केटला गेलो असता तेथे माल नव्हता, तर काही तुरळक ठिकाणी भाजीपाला होता़ मात्र, दलालाकडून लूटमार सुरू होती. अव्वाच्या सवा दरात भाजीपाला विकला जात होता. त्यामुळे भाजीपाला खरेदी केला नाही व आज दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, असे भाजी विक्रेते चंद्रकांत भोसले म्हणाले.