पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:56 IST2025-03-18T15:53:56+5:302025-03-18T15:56:43+5:30
अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे

पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना
इंदापूर : हुंडाई कारला पिकअपने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले. पुणे सोलापूर महामार्गावर काळेवाडी नं.१ च्या हद्दीत सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमी झालेले सर्व प्रवासी मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील रहिवासी आहेत.
गणेश विलास थोरात (वय २२ वर्षे), नदीफ रफिक सय्यद (वय २४ वर्षे), स्वप्निल महादेव जाधव (वय २० वर्षे),ओंकार जयनेंद्र पवार (वय २० वर्षे),कुणाल राजू चव्हाण (वय १५वर्षे),अविनाश विजय जाधव (वय १६वर्षे),आदित्य दत्तात्रय भिसे (वय २०वर्षे), गोरुनाथ बसू राठोड (वय १८ वर्षे),प्रवीण चव्हाण (वय२२ वर्षे), शिवा आबा शिंदे (वय २२ वर्षे), अभिषेक लक्ष्मण धोत्रे (वय २३ वर्षे)राकेश प्रमोदकुमार रामे (वय १५ वर्षे) व पिकअप चालक शरद बाळासाहेब चव्हाण (वय ३३ वर्षे, सर्व रा.मांडवगण फराटा,ता. इंदापूर) अशी जखमींची नावे आहेत.
महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड यांनी सांगितले की, सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर काळेवाडी नं.१ च्या हद्दीत सोलापूरकडून पुण्याकडे पिकअप निघाली होती. तिने हुंडाई आय ट्वेन्टी कारला धडक दिली. दुभाजकाला क्रॉस करत तो पलटी झाल्याने अपघात झाला. अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशी व महामार्ग पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. चार रुग्णवाहिकांमधून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. हे सर्वजण लोणी देवकर गावच्या वेताळ बाबाच्या यात्रेतील लाईट डेकोरेशनच्या कामासाठी निघाले होते अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली.