गावांमधील कचरा उचलणार, वाहनांची उपलब्धता, निधी वर्गीकरणाच्या प्रस्तावाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:41 AM2018-01-12T02:41:11+5:302018-01-12T02:41:33+5:30
महापालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या ११ गावांमधील कचरा निर्मुलनासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून तेथील कचरा वाहून नेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रशासनाने या गावांमधील कामांसाठी निधी वर्गीकरणाचाही तयारी केली असून तसा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर सादर करण्यात येईल.
पुणे : महापालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या ११ गावांमधील कचरा निर्मुलनासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून तेथील कचरा वाहून नेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रशासनाने या गावांमधील कामांसाठी निधी वर्गीकरणाचाही तयारी केली असून तसा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर सादर करण्यात येईल.
स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्येक गावासाठी ३ कोटी याप्रमाणे ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे मोठ्या प्रकल्पांवरील अखर्चित राहणाºया निधीमधून ही रक्कम गावांच्या विकासाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव प्रशासन तयार करीत आहे. महापौर मुक्ता टिळक यांनीही यात लक्ष घातले असून नियोजनासाठी म्हणून संबधित विभागाला त्यांनी लक्ष देण्यास सांगितले आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले, की यापूर्वी या गावांचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासाकडे होते. त्यांच्याकडे कचरा वाहतूक करणाºया लहानलहान गाड्या आहेत. ही वाहने गावांमधील कचरा डेपोपर्यंत वाहून नेऊ शकत नाही. महापालिकेची वाहने शहरातील कचरा वाहून नेण्यात गुंतलेली असतात. त्यामुळे नव्याने वाहने उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र, आता वेळापत्रक तयार करण्यात आले असून या गावांसाठी मोठी वाहने तयार करण्यात येत आहेत. त्यानंतर सर्वच गावांमधून नियमितपणे कचरा उचलला जाईल.
कचराकुंड्या नाहीत व कचरा जिरवण्यासाठी दुसरा काहीही पर्याय नाही, यामुळे या गावांमधील नागरिकांकडून कचरा रस्त्यांवरच मोकळी जागा दिसेल तिथे टाकला जात आहे. त्यातून बहुसंख्य गावांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याबद्दल नागरिक तसेच विसर्जित ग्रामपंचायतींच्या माजी पदाधिकाºयांकडून तक्रारी येऊ लागल्या आहेत. हवेली तालुका कृती समितीनेही या गावांमधील कचरा व्यवस्थापन व आरोग्य विषयक सुविधांकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
त्याची दखल घेत घनचकरा व्यवस्थापन विभागाने आता तिथे विसर्जित ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाºयांकडून कामे करून घेण्यास सुरुवात केली आहे. या कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता त्यांची सेवा महापालिकेत वर्ग करण्यात आली असून त्यांच्या वेतनाचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल. गावांलगतच्या क्षेत्रीय कार्यालयांना हे कर्मचारी जोडून देण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचे नियोजनही तेथूनच केले जाणार आहे.
महापालिका प्रशासन या गावांमधील कामांसाठी गतिमान झाले असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी रक्कम वर्ग करून द्यायची तयारी दर्शवली, ही स्वागतार्ह बाब आहे. समितीच्या वतीने त्यांनाही यासाठी निवेदन देण्यात आले होते. ही सर्व गावे आता महापालिकेचाच एक भाग आहे, हे लक्षात घ्यावे व विकासात ती मागे राहू नयेत यासाठी लक्ष द्यावे हीच आमची मागणी आहे.
- श्रीरंग चव्हाण,
अध्यक्ष, हवेली तालुका कृती समिती