एका चित्रकाराची सातासमुद्रापार गरूड भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:33 PM2018-04-02T18:33:35+5:302018-04-02T18:41:36+5:30
पुण्यातील एका चित्रकाराच्या चित्राची रशिया येथील दहाव्या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
पुणे : कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात असा एखादा क्षण येतो जो त्याला आजवर कलेसाठी समर्पित केलेल्या जीवनाला सुंदरशी पावती देऊन जातो. पुण्यातील एका चित्रकाराच्या चित्राची रशिया येथील दहाव्या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या निवडीतून त्यांच्या कलाप्रवासात मानाचा तुरा रोवला गेला असून, पुण्याचीही मान अभिमानाने उंचावली आहे. उमाकांत कानडे असे या प्रसिद्ध चित्रकाराचे नाव आहे.
रशिया मध्ये दि. ११ ते २१ एप्रिल या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. चित्रकार उमाकांत कानडे हे भारती विद्यापीठाच्या कला महाविद्यालयात २५ वषार्पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या प्रदर्शनासाठी ते दिनांक १० एप्रिल रोजी रवाना होत आहेत. गेल्या तीन दशकापासून चित्रकार उमाकांत कानडे हे सातत्याने चित्रनिर्मिती करत आहे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, दुबई, इंडोनेशिया, तसेच दिल्ली ,कोलकात , बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, मुंंबई आणि पुणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहेत. विविध नामांंकित संस्थेत व मान्यवर व्यक्तींकडे त्यांची चित्रे संग्रहित आहेत. क्रुकवेलच्या साहाय्याने चित्रनिर्मिती हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य आहे. क्रुकवेलच्या शैलीतून संपूर्ण कॅनव्हासवर रेषांच्या आधारे विविध छटा निर्माण करून कृष्णधवल रंगसंगतीत त्यांचे चित्र उत्तम परिणाम साधतात. अनेक वर्षांचा अनुभव, अभ्यास, कौशल्य व बैठक यातून कानडे यांनी स्वत: ची चित्रशैली निर्माण केली आहे. चित्रांमध्ये ते झाडे, वेली, पाने , फुले , दगड , गाणारे पक्षी, रंगीत फुलपाखरे अशा निसर्गातील घटकांचा सुरेख वापर करुन ते सुंदर चित्र साकारतात. प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग वेगवेगळे रूपधारण करतो व प्राणी, पक्षी त्यानुसार आपले जीवन जगत असतात आणि हा जादुई बदल नेत्रचक्षुला अलौकिक आनंद देत असतो. त्याचाच चित्रात्मक तपशील म्हणजेच कानडे यांची चित्रे होय, अशी एक चित्रकार म्हणून कलाक्षेत्रात त्यांची ख्याती आहे.