चित्रप्रदर्शनातून स्त्रीच्या अंतर्मनाचा ठाव
By admin | Published: April 12, 2015 12:33 AM2015-04-12T00:33:42+5:302015-04-12T00:33:42+5:30
सृजनशीलता, शक्ती अशा अंतर्मनातील विविध रूपांचे दर्शन चित्रकार शैला गोऱ्हे यांनी पहिल्यावहिल्या ‘वूमन विदिन’ या चित्रप्रदर्शनातून रसिकांना घडविले आहे.
पुणे : स्त्री म्हणजे सुंदरता, वात्सल्य, करूणा यांचे प्रतिक. पंचमहाभूतांच्या तत्वावर अनुसरून साकारलेल्या ‘तिच्या’ तेज, प्रेम, सृजनशीलता, शक्ती अशा अंतर्मनातील विविध रूपांचे दर्शन चित्रकार शैला गोऱ्हे यांनी पहिल्यावहिल्या ‘वूमन विदिन’ या चित्रप्रदर्शनातून रसिकांना घडविले आहे. विचार आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून स्त्रीची युगंधरा, विश्वमंगला, तेजोमंडिता, भयरहिता, बंधनमुक्त अशा मूर्तीमंत आणि वास्तववादी रूपांचे सौंदर्य चित्रांमध्ये उलगडून दाखविण्यात आले आहे.
बालगंधर्व कलादालन येथे प्रसिद्ध अभिनेते राजन भिसे आणि गायिका सावनी शेंडे-साठ्ये यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सृजनशीलता, नवनिर्मिती हा पृथ्वीप्रमाणेच स्त्रीचाही गाभा आहे, हे दर्शविणारी युगनिर्मिती युगंधरा , संपूर्ण विश्वाला आपल्या प्रेमरूपी जलाने न्हाऊ घालणारी ‘विश्वमंगला’, स्वकर्तृत्वाच्या आत्मतेजाने विश्वाला प्रकाशमान करणारी आणि तेजत्वाचे प्रतीक असलेली ‘तेजोमंडिता’ तसेच कोणत्याही संकटाला आपल्या बाहूंनी कणखरपणे थोपविणारी वायूत्त्वावर आधारित ‘भयरहिता’, आपल्या स्वप्नातील सखा तिला भेटल्यावर मनोमीलन झाल्यावर सर्व बंधने टाकून अज्ञाताच्या प्रवासाला मार्गस्थ होणारी ‘बंधनमुक्ता’ अशी स्त्रीची अनेक रूपे प्रदर्शनात पाहायला मिळतात.
राजन भिसे म्हणाले, ‘‘प्रत्येक चित्राचा स्वर असतो तसेच प्रत्येक स्वराचे एक चित्र असते. चित्र आपल्याला आवडत नाहीत तर भावतात. ’’ गायन आणि चित्रही परस्परपूरक कला असून, या दोन्ही कला अभिव्यक्तीचे माध्यम असल्याचे सावनी शेंडे हिने सांगितले. प्रदर्शन १३ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)