‘गोवळकोंडा’तील शिवछत्रपतींचे चित्र उजेडात; फ्रान्समधील सॅव्ही वस्तुसंग्रहालयातून ऐतिहासिक वारसा समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 08:21 AM2021-11-13T08:21:57+5:302021-11-13T08:22:04+5:30
राज्याभिषेकानंतर तीन वर्षांनी शिवाजी महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर गेले असताना त्यांची या शैलीत अनेक चित्रे काढली गेली.
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची करारी आणि प्रसन्न मुद्रा, डोक्यावर शिरोभूषण व तुरा, खांद्यावर शेला, डाव्या बाजूला खोवलेली कट्यार, दोन्ही हातांची बोटे सहजतेने पुढ्यात एकमेकांवर ठेवलेली असून, एका मोकळ्या जागेत उभे असलेले सतराव्या शतकातील गोवळकोंडा शैलीमध्ये रेखाटलेले आणखी एक चित्र उजेडात आले आहे. हे दुर्मीळ चित्र फ्रान्समधील सॅव्ही नावाच्या संग्राहकाच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयामध्ये आहे.
राज्याभिषेकानंतर तीन वर्षांनी शिवाजी महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर गेले असताना त्यांची या शैलीत अनेक चित्रे काढली गेली. त्यापैकी हे चित्र असून, चित्रकार अज्ञात आहे. फ्रेंच अधिकाऱ्याने प्रस्तुत चित्रे विकत किंवा हस्तांतरित करून युरोपमध्ये पाठविली असण्याची शक्यता आहे, असे इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.प्रस्तुत चित्रासह सतराव्या शतकातील कुतुबशाह, औरंगजेब, मादण्णा या राजकीय व्यक्तींची चित्रे फ्रान्स येथील संग्रहालयात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
काय आहे चित्रशैली?
शिवकाळात भारतात अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. कुतूबशाहाची राजधानी असलेल्या आंध्रप्रदेशातील गोवळकोंडा येथे प्रचलित असलेल्या चित्रशैलीला गोवळकोंडा चित्रशैली असे म्हणतात. या शैलीमध्ये चित्राभोवती सोनेरी पानांची नक्षी, मागे एकरंगी पार्श्वभूमी (या चित्रात हिरवी) आणि एकाबाजूने काढलेली चित्रे (या चित्रात डाव्या)असतात. रंगसंगती आणि चौकट पद्धत हे वैशिष्ट्य आहे.