शिवरायांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा दाखवणारं चित्रप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:17 PM2019-05-09T16:17:39+5:302019-05-09T16:19:30+5:30
शिवरायांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा दाखवणारं अनाेखं चित्रप्रदर्शन पुण्यातील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे.
पुणे : शिवरायांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा दाखवणारं अनाेखं चित्रप्रदर्शन पुण्यातील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. चित्रकार नितीन अडके यांनी ही चित्रे काढली असून ही चित्रे काढण्यासाठी त्यांनी केवळ 12 रंगांचे बाॅलपेन वापरले आहेत.
प्रत्येक माेहिमेआधी किंवी माेहिम फत्ते केल्यानंतर शिवाजी महाराज यांच्या मनामध्ये कुठल्या भावना असतील याचा विचार करुन शिवरायांच्या भावमुद्रा चित्रातून रेखाटण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे विविध बाॅलपेनच्या सहाय्याने ही चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांमध्ये जिवंतपणा दिसून येताे.
शिवाजी महाराजांच्या चित्रांबराेबरच कुंभमेळ्यातील विविध क्षणचित्रे देखील या प्रदर्शनात अडके यांनी मांडली आहेत. या प्रदर्शनाबाबत अडके म्हणाले, आजपर्यंत शिवाजी महाराजांची अनेक चित्रकारांनी चित्रे काढली. शिवाजी महाराज हे आपल्या सारखे सामान्य माणूस हाेते. परंतु तरीसुद्धा त्यांनी एक असामान्य काम केले. महाराजांचे असामान्य कर्तृत्व हे या चित्रप्रदर्शनामागील एक प्रेरणा आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये, त्यांनी केलेल्या स्वाऱ्यांच्यावेळी त्यांच्या मनात काय विचार असतील असा विचार करुन विविध भाव रेखटण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांना आपल्या जवळ आणतील असे भाव टिपण्याचा प्रयत्न मी या प्रदर्शनातून केला आहे. परदेशी रंग न वापरता बाॅलपेनच्या सहाय्याने ही चित्रे काढली आहेत.