समाजमाध्यमांवर ‘पिफ’ ट्रेडिंगमध्ये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:14+5:302021-03-22T04:09:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत चित्रपटरसिक घरबसल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत. पुणे फिल्म फाउंडेशन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत चित्रपटरसिक घरबसल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने गुरुवारपासून (दि. १८) सुरू झालेल्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ला राज्याबरोबरच देशभरातून रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. चित्रपटांचे विषय, त्यांची निवड आणि ऑनलाइन व्यासपीठाच्या सुरक्षिततेची खात्री यामुळे चित्रपटप्रेमी आनंदात आहेत. समाजमाध्यमांवर ऑनलाइन पिफ ट्रेडिंगमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
१९ व्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ‘लैला इन हायफा’ या चित्रपटाने प्रारंभ झाला. या वर्षीच्या महोत्सवासाठी न्यूझीलंड येथील शिफ्ट ७२ या व्यासपीठाचा वापर केला आहे. पायरसी, रेकॉर्डिंग करता येणे शक्य नसल्याने सुरक्षिततेची भावना असल्याचे अनेक प्रेक्षकांनी कळविले आहे. एकीकडे चित्रपटांचा आस्वाद घेत असताना दुसरीकडे प्रेक्षक समाजमाध्यमांवर देखील महोत्सवाबद्दल भरभरून बोलत आहेत. अनेक समीक्षक आपापल्या ब्लॉग्ज वरून महोत्सवाचे कौतुक करीत आहेत तर प्रेक्षकदेखील फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींवर फोटो शेअर करीत पिफ ट्रेंड देखील करीत आहेत. शिफ्ट ७२ सोबतच महोत्सवात निवडलेल्या गेलेल्या चित्रपटांच्या दूतावासांनी देखील आपापल्या पातळीवर महोत्सवास प्रसिद्धी दिली असून आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आहे. प्रामुख्याने आतापर्यंत भारतात प्रदर्शित न झालेले चित्रपट घरबसल्या पाहता येत असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत, असे महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
---
‘पिफ’सासाठी केवळ राज्यामधूनच नव्हे तर देशभरातून रसिकांनी नोंदणी केली आहे. ते त्यांच्या सोयीने सुरक्षितपणे घरात बसून महोत्सवाचा आस्वाद घेत आहेत. उत्तरप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, आसाम अशा अनेक राज्यांमधून प्रेक्षक महोत्सवात सहभागी झाले आहेत. जागतिक चित्रपट विभागात निवडलेल्या चित्रपट, माहितीपट यांचे कौतुक देखील करीत आहेत.
-डॉ. जब्बार पटेल, संचालक, पिफ