पिफ आठवडाभरासाठी पुढे ढकलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:13 AM2021-02-27T04:13:00+5:302021-02-27T04:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील सध्याची कोरोनाची स्थिती पाहता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) आठवडाभर पुढे ढकलण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील सध्याची कोरोनाची स्थिती पाहता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. पूर्वी जाहीर केलेल्या ४ मार्चऐवजी आता ११ ते १८ मार्च दरम्यान पिफ महोत्सव होईल.
राज्य शासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. पिफ हा शासनाचा अधिकृत महोत्सव असल्याने शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यावर हा महोत्सव आठवडाभर पुढे ढकलला असल्याचे पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कळविले आहे.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दरवर्षी पुण्यात होणाऱ्या या महोत्सवाचे हे सलग १९ वे वर्ष आहे. यंदा कोरोनामुळे चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाइन देखील महोत्सवाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत ५० टक्के इतक्याच क्षमतेने चित्रपटगृहात महोत्सव होईल. यावर्षी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि कॅम्प परिसरातील आयनॉक्स या ३ ठिकाणी ७ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार आहेत. इच्छुकांना www.piffindia.com या संकेतस्थळावर इच्छुकांना ऑनलाइन नोंदणी करता येईल.