पुणे फेस्टिवलचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते होणार; जेष्ठ अभिनेत्री हेमामालिनी सादर करणार गंगा बॅले
By श्रीकिशन काळे | Published: September 4, 2023 03:16 PM2023-09-04T15:16:37+5:302023-09-04T15:20:51+5:30
हेमामालिनी यांच्यावर चित्रित केलेल्या चित्रपटातील गाण्यांवर आधारित गोल्डन इरा आॅफ ड्रीम गर्ल हा नृत्याचा कार्यक्रम सादर होणार
पुणे : यंदा ३५ व्या पुणे फेस्टिवलचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम होईल, अशी माहिती पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी फेस्टिवलचे मुख्य समन्वयक ॲड. अभय छाजेड, रमेश बागवे, आबेदा इनामदार आदी उपस्थित होत्या. उद्घाटनप्रसंगी पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते नाना पटोले उपस्थित राहणार आहेत.
यंदा जेष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांचा गंगा बॅले, लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम यांची म्यूझिकल नाइट, आॅल इंडिया मुशायरा, जाणता राजा प्रयोग, मिस पुणे फेस्टिवल, महिला महोत्सव, केरळ महोत्सव, कीर्तन महोत्सव, मराठी कवी संमेलन, बाॅक्स, कुस्ती व मल्लखांब अशा क्रीडा स्पर्धा ही फेस्टिवलची वैशिष्ट्ये आहेत. हेमामालिनी यांच्यावर चित्रित केलेल्या चित्रपटातील गाण्यांवर आधारित गोल्डन इरा आॅफ ड्रीम गर्ल हा नृत्याचा कार्यक्रम सादर होईल. त्यात अभिनेत्री उर्मिला कानेटकर, नुपूर दैठणकर, श्वेता शेवाळे यांच्यासह नृत्यतेज अकादमीचे सहकलावंत सहभागी होती.
अखिल भारतीय मुशायरामध्ये देशातील नामवंत शायर सहभागी होत आहेत. त्यात डॉ. मंजर भोपाळी, डॉ. लता हया, सागर त्रिपाठी आदींना आमंत्रित केले आहे. हा मुशायरा २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होईल.
डॉ. संचेती यांना जीवनगौरव
यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ जय गणेश पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदा खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ आणि श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट, सोमवार पेठ यांना पुरस्कार देऊन गाैरविण्यात येईल.