‘पिफ’चे आज होणार उद्घाटन; रसिकांची होणार ‘दमछाक’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 01:00 AM2020-01-09T01:00:00+5:302020-01-09T01:00:02+5:30
सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख राहणार उपस्थित
पुणे : देशविदेशातील विविध चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास उद्या (९ जानेवारी) पासून मोठ्या दिमाखात सुरूवात होत आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता ‘पिफ’चा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.
‘पिफ’च्या उद्घाटन सोहळ्यात ‘सीआयडी’ सारख्या हिंदी मालिकांचे दिग्दर्शक बी. पी. सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीच्या ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबरोबरच सीआयडी या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्याबरोबर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेता सुबोध भावे यांची खास उपस्थिती असणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
‘महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ अशी या वर्षीच्या महोत्सवाची ‘थीम’ असून, या कार्यक्रमानंतर जुआन होजे कँपानेला दिग्दर्शित ‘द विझल्स टेल’ हा अर्जेंटीनाचा चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून लॉ कॉलेज रस्ता व कोथरूड येथील एनएफएआयमध्ये दाखविला जाईल. उद्या (९ जानेवारी) पासून दि. १६ जानेवारीपर्यंत देशविदेशातील तब्बल १९१ चित्रपट पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
.................
रसिकांची होणार ‘दमछाक’
दरवर्षी ‘पिफ’चा उद्घाटन सोहळा ज्या ठिकाणी आयोजित केला जातो. तिथेच ‘ओपनिंग फिल्म’ दाखवली जाते. मात्र यंदा उद्घाटन सोहळा ‘बालगंधर्व’ ला आणि चित्रपटाचे स्क्रिनिंग ‘एनएफ आय विधी महाविद्यालय रस्ता आणि कोथरूड’ला होणार असल्याने रसिकांची चांगलीच दमछाक होणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक व्यक्ती उद्घाटन सोहळ्याला कितपत फिरकतील हा प्रश्नच आहे.