डुक्कर मुक्त शहर मोहिमेच्या घोषणेचा उडाला फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 09:03 PM2018-09-28T21:03:56+5:302018-09-28T21:07:58+5:30
महापालिका आयुक्तांनी शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी १० सप्टेंबरपासून खास मोहिम हाती घेतली. पण दोनच दिवसांत ही मोहिम बंद पडली.
पुणे: शहरात भटक्या डुकरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून, पुणेकर त्रस्त आहेत. महापालिका आयुक्तांनी शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी १० सप्टेंबर पासून खास मोहिम हाती घेतली, पण दोनच दिवसांत ही मोहिम बंद पडली. त्यामुळे डुक्कर मुक्त मोहिम फार्स ठरली आहे. डुक्कर पकडण्यासाठी लाखो रुपयांचा ठेका दिला असताना महापालिकेच्या कोणताही अनुभव नसलेल्या अप्रशिक्षित कर्मचा-यांना काम लावले आहे. याबाबत शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी डुकरांची प्रतिकृती आणून घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला.
महापालिकेची सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर लगेचच डुक्कर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी प्रतिकात्मक डुकरांसह सभागृहात प्रवेश केला. शहर डुक्कर मुक्त झालेच पाहिजे, ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या. महापालिका प्रशासनाला शहारातील भटकी कुत्री आणि डुक्कर पकडण्यात यश मिळत नाही. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी १० सप्टेंबरपासून शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी कारवाई मोहिम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्या घोषणेचे पुढे काय झाले? वराह पालन करणारे लोक व्यावसाय करतात, त्यांच्या व्यावसायाचा त्रास नागरिकांनी का सहन करायचा,हे शहर डुकरांचे शहर म्हणून ओळखले जाण्याची वाट प्रशासन पहात आहे की काय, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. वराह पालन करणाऱ्या व्यावसायिकांचे शहराबाहेर पुर्नवसन त्वरीत करावे. जे व्यावसायिक शहराबाहेर स्थलांतर करणार नाहीत, त्यांचे स्थलांतर बळजबरीने करावे, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. यावेळी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, गफुर पठाण, आबा तुपे, प्रकाश कदम, अॅड. अविनाश साळवे, जयंत भावे, सिद्धार्थ शिरोळे, नाना भानगिरे, ज्योत्स्ना एकबोटे, दिलीप वेडे पाटील, योगेश ससाणे, अनिल टिंगरे,कल्पना वरपे, अर्चना मुसळे, प्रवीण चोरबेले, गोपाळ चिंतल, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी भटक्या डुक्कर आणि कुत्र्यांच्या समस्येवर प्रकाश टाकला.
दरम्यान याबाबत प्रशासना मार्फत खुलासा करताना अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांनी सांगितले की, कुत्र्यांना पकडणे व मारणे यासाठी प्राणी संरक्षणाचे कायदे आहेत. ३७५२ कुत्री आत्तापर्यंत पकडली आहेत. बाणेर येथे पकडलेल्या कुत्र्यांसाठी डॉग स्पॉड केले जाणार आहे. कुत्र्यांची गणणेसंबंधी मोहिम हाती घेतली जाणार आहे. भटक्या डुकरांचा उपद्रव हडपसर परिसरात जास्त आहे. हा व्यावसाय बीगर भांडवली असल्याने हितसंबंध जोपासणारे डुक्कर पकडण्यास जाणा-या कर्मचा-यांवर हल्ले करतात. डुक्कर पकडण्याचे काम ठेकेदारास दिले आहे. पकडलेली डुकरे ओळखी येण्यासाठी डुकराच्या कानाला बिल्ले लावले आहेत. त्यामुळे एकदा पकडलेली डुकर दुसरीकडे सोडली जातात, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
-----------
स्वाईन फ्लू रोखण्यासाठी वेळीच उपाय-योजना करा
गेल्या काही दिवसांत शहरामध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून, परिस्थिती गंभीर रुप धारण करण्यापूर्वीच महापालिकेने योग्य उपाय-योजना करण्याची मागणी सदस्यांनी केली. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये टॅमी फ्लू च्या गोळा उपलब्ध करुन देण्याची देखील मागणी करण्यात आली. सदस्यांची तीव्र भावना लक्षात घेता, स्वाईन फ्लूची पाठीमागील परिस्थिती पाहता पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने बैठक घेऊन या समस्येवर त्वरीत उपाय करण्यासाठी हालचाली कराव्यात, अशा सूचना यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिले.