व्यावसायिक शिक्षणाचे पाईक महाराष्ट्र विद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:12+5:302021-03-17T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना लोकमान्य टिळकांनी रुजवली. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र या त्रिसूत्रीचा अवलंब करायला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना लोकमान्य टिळकांनी रुजवली. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र या त्रिसूत्रीचा अवलंब करायला ते सांगत. राष्ट्रीय शिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यावेळच्या विद्वान लोकांच्या लक्षात आले आणि विविध शिक्षण संस्था स्थापन झाल्या. त्या काळात व्यावसायिक शिक्षणाची गरज होती, हे ओळखून व्यावसायिक शिक्षणासाठी महाराष्ट्र विद्यालय चालू झाले. कर्मयोगी लोकांनी निर्माण केलेली ही संस्था आहे. ध्येयवादी वाटचालीमुळे संस्थेने शंभर वर्षे उत्कृष्ट कार्य केले. पुढील कार्यकाळातही प्रगतीचा आलेख असाच चढता राहावा,” अशी अपेक्षा संत साहित्याचे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केली.
पुणे विद्यार्थी गृह संचालित महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोरे बोलत होते. सहकारनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (दि. १६) झालेल्या या सोहळ्यास आमदार मुक्ता टिळक, उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेवक धीरज घाटे, पंडित वसंतराव गाडगीळ, विद्यालयाचे संस्थापक डॉ. ग. श्री. अण्णासाहेब खैर यांच्या स्नुषा विजया खैर, नियामक मंडळाच्या सदस्य पौर्णिमा लिखिते, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, उपकार्याध्यक्ष संजय गुंजाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक प्राचार्य हणमंत भोसले आदी उपस्थित होते.
सदाशिव पेठेतील संस्थेच्या आवारात कुलगुरू दादासाहेब केतकर यांच्या पुतळ्यास हार घालून महोत्सवाची सुरवात झाली. प्रसंगी महाराष्ट्र विद्यालयाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. डॉ. मोरे म्हणाले, “ही संस्था सुरु झाली त्यावेळी मुबलक संधी असल्याने जो शिकेल, तो मोठा व्हायचा. होतकरू मुलांना दानशूरांकडे वार लावून किंवा माधुकरी मागून शिकावे लागे. अशा काळात ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना घडवणारी ही संस्था आहे. हीच समर्पित भावना पुढील शंभर वर्षातही राहावी.” पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका राजश्री कसबे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णुदास गावडे यांनी आभार मानले.