तीर्थक्षेत्र आळंदी : सलग दुसऱ्या दिवशी पवित्र इंद्रायणी रसायनयुक्त फेसाने फेसाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 03:41 PM2024-06-22T15:41:15+5:302024-06-22T15:42:07+5:30

विशेषतः आषाढीवारी पाच ते सहा दिवसांवर आल्याने आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ असणे गरजेचे असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे....

Pilgrimage Alandi: For the second day in a row, holy Indrayani was foamed with chemical foam | तीर्थक्षेत्र आळंदी : सलग दुसऱ्या दिवशी पवित्र इंद्रायणी रसायनयुक्त फेसाने फेसाळली

तीर्थक्षेत्र आळंदी : सलग दुसऱ्या दिवशी पवित्र इंद्रायणी रसायनयुक्त फेसाने फेसाळली

- भानुदास पऱ्हाड

आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. विशेषतः आषाढीवारी पाच ते सहा दिवसांवर आल्याने आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ असणे गरजेचे असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे.

मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायन मिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्या खालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे. अगदी पाण्यावर तरंगणारा फेस पाहून समक्षदर्शीना बर्फाच्छादित भागाची आठवण होत आहे.

इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दुरोगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तर इंद्रायणीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्या व त्यात स्नान करणाऱ्या वारकऱ्यांना पोटाचे विकार तसेच त्वचा विकार देखील पसरण्याचा धोका संभवतो आहे. याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

उपाययोजना कागदावर...

हिवाळी अधिवेशनात आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा शासनासमोर लक्षवेधी करून मांडला होता. मंत्री उदय सामंत यांनी इंद्रायणी नदीबाबत सकारात्मक पावले उचलणार असून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र प्रत्यक्षात फारशा उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन मग्न असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया स्थानिक जनतेकडून व्यक्त होत आहेत.

वारकऱ्यांनी पाणी पिऊ नये...

आषाढीवारी निमित्त पुढील चार ते पाच दिवसात लाखो वारकरी आळंदीत दाखल होणार असून इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करणार आहेत. तसेच तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी काही वारकरी प्राशन करतात. मात्र पाण्यात रसायन मिश्रण असल्याने वारकऱ्यांनी नदीतील पाणी पिणे घातक ठरू शकते. तर या पाण्यामुळे आजारही जडू शकतात. मागील काही वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवत आहे. विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत. 

इंद्रायणी नदीबाबतची उदासीनता दूर होणार का? एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे, तर दुसरीकडे राज्यसरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा एवढीच स्थानिक जनता व वारकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.

दोनशे क्यूसेक्स पाणी सोडले...

आषाढी सोहळयाच्या पार्श्वभूमीवर आळंदी व देहूसाठी आंद्रा धरणातून १०० व वडिवळे धरणामधून १०० असा एकत्रितपणे दोनशे कुसेक्स पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये बुधवारपासून (दि. १९) सोडण्यात आलेला आहे. साधारणपणे 25 तारखेपर्यंत हे पाणी आळंदी येथील इंद्रायणी पात्रात पोहचेल अशी माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

Web Title: Pilgrimage Alandi: For the second day in a row, holy Indrayani was foamed with chemical foam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.