तीर्थक्षेत्र आळंदीनगरी बोलू लागली पर्यावरणाची बोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:32+5:302021-03-05T04:10:32+5:30
आळंदी : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील सार्वजनिक ...
आळंदी : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या भिंती व दुभाजकांवर आकर्षक रंगरंगोटीचे काम करण्यात आले आहे. शहरातील रहिवाशी, वाणिज्य तसेच सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या भिंतींवर स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी आकर्षक चित्रे आता येता-जाता नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात पर्यावरण संवर्धनासाठी बरेच नावीन्यपूर्ण उपक्रम नगरपरिषद हाती घेणार असल्याचे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक भिंतीवर तसेच दुभाजकांवर निसर्गाच्या पंचतत्त्व संरक्षणाचे विविध संदेश रेखाटून शहराला पर्यावरणाचा एक बोलता घटक बनविण्याचा प्रयत्न नगरपरिषदेने केला आहे.
प्रत्येक प्रभागाचे नगरसेवकांच्या सहकार्याने त्या-त्या प्रभागातील सार्वजनिक भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियानातील शहर सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून शहरात आता पर्यावरण संवर्धनाची बोलकी चित्रे आणि विविध स्वच्छता व पर्यावरणविषयक संदेश रेखाटून शहरास अधिक उठावदार बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत सार्वजनिक भिंती, दुभाजकांवर रंगरंगोटी व संदेश रेखाटण्यात आले आहेत.(छाया : भानुदास पऱ्हाड)