तीर्थक्षेत्र विकास आराखडा : पालखीतळाच्या कामात अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:49 AM2018-03-08T02:49:52+5:302018-03-08T02:49:52+5:30
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत इंदापूरसह सराटी व निरवांगी येथे पालखीतळाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कामांच्या पूर्ततेसाठी १२० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
इंदापूर - तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत इंदापूरसह सराटी व निरवांगी येथे पालखीतळाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कामांच्या पूर्ततेसाठी १२० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
पालखी येण्यापूर्वी येत्या जून महिन्याच्या आधी कामे पूर्ण व्हावीत, असा कामाचा वेग असणे अपेक्षित आहे. मात्र, इंदापूर व निरवांगी येथील कामासाठी नैसर्गिक वाळूच्या तुटवड्यासह निरवांगीच्या ग्रामस्थांचा संरक्षक भिंत बांधण्यास असलेला विरोध, सराटी येथील पालखीच्या नियोजित जागेवरील अतिक्रमणे, झाडेझुडपे व सखल जागेमुळे पाण्याचा निचरा होण्यात येणारी अडचण यामुळे कामात अडथळे येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शासनाच्या नियोजन विभागाच्या श्रीक्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत इंदापूरच्या पालखीतळाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी झाला. इंदापूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेत १ कोटी ३० लाख ७९ हजार रुपये खर्च करून पालखीतळ उभारण्याचे नियोजन आहे.
सभामंडप, अंतर्गत रस्ते व
सेप्टिक टँक असे या कामाचे स्वरूप आहे. सभामंडप व सेप्टिक टँकची खोदाई पूर्ण झाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून जागेसंदर्भात येणारी अडचण दूर करण्यास आमदार भरणे यांनी प्रयत्न केले असले, तरी नैसर्गिक वाळूचा तुटवडा हा येथील कामातील मोठी अडचण आहे. शहरातील इतर बांधकामांप्रमाणे दगडाच्या चुºयाने बांधकाम करावे लागणार आहे.
अतिक्रमणे हटविण्याचेही आहे आव्हान
सराटीच्या पालखीतळासाठी ४ कोटी ३७ लाख ६ हजार ६०० रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. संरक्षक भिंत, कमान, अंतर्गत रस्ते, सेप्टिक टँक असे या कामाचे स्वरूप आहे.
पालखीतळाच्या नियोजित जागेवर अतिक्रमणे आहेत. झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्याच्या साफसफाईची तरतूद कामाच्या अंदाजपत्रकात नाही. ही जागा सखल असल्याने पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था नाही. अद्याप येथे काम सुरू झालेले नाही.
निरवांगी येथील पालखीतळासाठी २ कोटी ४८ लाख ४ हजार १०० रुपये खर्चाची तजवीज करण्यात आली आहे. संरक्षक भिंत, कमान, सेप्टिक टँक असे कामाचे स्वरूप आहे. संरक्षक भिंत व सेप्टिक टँकची खोदाई पूर्ण झाली आहे. मात्र, निरवांगीच्या ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी नदीकाठापासून एक एकर जागेकरिता संरक्षक भिंत बांधण्यास मज्जाव केला आहे. स्थानिक शेतकºयांचाही त्याला विरोध आहे.