तीर्थक्षेत्र आळंदीत खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पुन्हा लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:56 IST2025-03-04T18:55:38+5:302025-03-04T18:56:47+5:30
तीर्थक्षेत्र आळंदीत अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

तीर्थक्षेत्र आळंदीत खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पुन्हा लैंगिक अत्याचार
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीत पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देहू फाट्याजवळील एका खाजगी संस्थेत हा प्रकार घडला असून, दिघी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांत आळंदीतील खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी दोन अल्पवयीन मुलांवर पाहुण्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच एका महाराजाकडून तेरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकारही समोर आला होता. या वाढत्या घटनांमुळे आळंदीची प्रतिष्ठा डागळली असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर आळंदीकरांनी एकत्र येत ‘सर्व खाजगी वारकरी शिक्षण संस्था बंद कराव्यात’ असा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ४८ तासांत अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाईचे आदेश दिले होते. प्रशासनाने विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असला, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ‘या संस्थांवर तातडीने कठोर कारवाई करावी’ अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.