पिंंपरी चिंचवडला रेडझोनमधून वगळले, मध्यरात्रीपासून अंमलबजावणी, बाजारपेठ होणार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 10:55 PM2020-05-21T22:55:31+5:302020-05-21T22:55:43+5:30
रुग्णवाढीचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने रेड झोनमधून अनेक शहरे वगळली, त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश होता.
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरास रेड झोन मधून वगळले असून त्याची अंमलबजावणी गुरुवार मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यापासून बाजारपेठ खुली होणार आहे. तर चार दिवसांत पीएमपी बससेवा सुरू होणार आहे. मात्र , मॉल, चित्रपट गृहे सुरू होणार नाहीत. सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी जारी असणार आहे, कटेन्मेंट झोन मधील बंदी कायम असणार आहे, असे पिपरीचिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केले आहे.
रुग्णवाढीचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने रेड झोनमधून अनेक शहरे वगळली, त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश होता. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्ण वाढीचा आलेख गेल्या तीन दिवसांपासून वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री दहा वाजता शहराला नोन रेड झोन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी करण्यात आले आहेत. यामध्ये काही बंधने घातली आहेत, नियमावली तयार केली आहे.
या गोष्टीना असणार बंदी
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मेट्रो, रेल प्रवास, शाळा-कॉलेज शैक्षणिक संस्था, हॉटेल रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, शॉपिंग सेंटर व्यायामशाळा, तरण तलाव , सभाग्रह नाट्यगृह, सामाजिक धार्मिक, राजकीय, क्रीडा मनोरंजन, सभा संमेलनं यास बंदी राहणार आहे. त्याचबरोबर सर्व धार्मिक स्थळे धार्मिक कार्यक्रम सभा-संमेलने होणार नाहीत.
तसेच शहर परिसरामध्ये अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा व्यतिरिक्त सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी राहणार आहे. त्याचबरोबर 65 वर्षावरील सर्व व्यक्ती अति जोखमीची आजार असणाऱ्या तसेच वय वर्षे दहा वयोगटातील मुलांना अत्यावश्यक सेवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गोष्टी बंद राहणार आहेत.
काय राहणार सुरू
सर्व प्रकारचे मालवाहतुकीचे ट्रक यांना वाहतुकीसाठी परवानगी राहणार आहे. तसेच क्रीडा संकुले, स्टेडियम खुली सार्वजनिक ठिकाणे एकट्याने खेळायचे खेळ खेळ योगासने यांना परवानगी असेल. मात्र क्रिकेट, फुटबॉल बॅडमिंटन, कबड्डी ,खो-खो या गोष्टींना परवानगी असणार नाही. त्याचबरोबर दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे तसेच तीन चाकी मध्ये चालकांनी दोन व्यक्ती चार चाकी मध्ये चालक आणि दोन व्यक्तींना परवानगी असणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये 26 मेपासून पीएमपीच्या बस 50 टक्के एवढ्या क्षमतेने वाहतूक करता येईल. तसेच सर्व बाजारपेठेतील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी पाचच्या दरम्यान खुली राहतील. या ठिकाणी गर्दी होऊन सामाजिक शारीरिक अंतर राखण्याचे निकषाचे उल्लंघन झाल्यास दुकाने तात्काळ बंद करण्यात येतील. पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व औद्योगिक कंपन्यांमध्ये कामावर उपस्थित राहण्यासाठी सर्व रेडझोन क्षेत्रातून येण्यासाठी महापालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. औद्योगिक आस्थापना 100% सुरू ठेवता येईल. खाजगी कार्यालय माहिती तंत्रज्ञान विषयक अस्थपणा जास्तीत जास्त 50% मनुष्यबळाचा सुरू करता येईल. तसेच बाजारपेठांमधील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील.
तसेच चिंचवड स्टेशन , पिंपरी कॅम्प, गांधी पेठ चिंचवड, काळेवाडी मेन रोड, अजमेरा पिंपरी , निगडी बस स्टॉप जकात नाका परिसर , या भागातील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळात समविषम तारखेस खुली राहतील. या आदेशाची अंमलबजावणी शुक्रवारी गुरुवारी मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.