Pimpri Chinchwad: आणखी किती अपघातांची वाट पाहणार? ग्रेडसेपरेटर जलदगती मार्गही झाला धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 11:41 AM2023-06-28T11:41:38+5:302023-06-28T11:45:01+5:30
पावसाळा सुरू झाला आहे. महापालिका प्रशासन उपाययोजनांसाठी आणखी किती अपघातांची वाट पाहणार आहे, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे....
पिंपरी :पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी-चिंचवड शहरातून दापोडी ते निगडी असा प्रमुख रस्ता आहे. त्यावर शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र लेन, बीआरटी मार्ग आणि ग्रेडसेपरेटर आहे. मात्र, या मार्गावर ग्रेडसेपरेटरमधून इन आणि आउटच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक नियोजन करणारे वॉर्डन गायब झाले आहेत. पावसाळा सुरू झाला आहे. महापालिका प्रशासन उपाययोजनांसाठी आणखी किती अपघातांची वाट पाहणार आहे, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी ते पिंपरी या मार्गावरील बीआरटी मार्ग सुरू करण्यास दहा वर्षांचा कालखंड लागला. हा मार्ग सुमारे १०.५ किलोमीटरचा आहे. बीआरटी मार्गावरून दिवसाला २३६ बसगाड्या धावतात. पुण्याच्या विविध भागात जाणाऱ्या आणि पुण्यावरून पिंपरी-चिंचवड आणि इतर भागात जाणाऱ्या दिवसाला अडीच हजार फेऱ्या होणार आहेत. अर्थात एका मिनिटाला एक बस या मार्गावरून धावते. हजारो वाहने ग्रेडसेपरेटरमधून जातात. या मार्गावर ग्रेडसेपरेटर, बीआरटीमार्ग आणि सर्वसामान्य वाहनांसाठी स्वतंत्र तीन मार्ग आहेत. मध्यभागी असलेला ग्रेड सेपरेटर मधून जड वाहने आणि जी वाहने शहरात येणार नाहीत, त्यासाठी आहे. त्यास जोडून बीआरटी आणि शहरातील वाहनांसाठी मार्ग तयार केला आहे. या मार्गावरून आत येताना आणि बाहेर पडताना सुरक्षा रक्षक नाहीत.
उपाययोजनांकडे दुर्लक्ष
बीआरटी सुरू करणे अपघातास निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे या मार्गावरील बीआरटीबाबत उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर २०१७ मध्ये श्रावण हर्डीकर यांनी आयआयटीच्या मदतीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आणि मार्ग सुरू झाला. मात्र, या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत आहे.
ऑटोमेटिक सिग्नल यंत्रणेकडे दुर्लक्ष
बाआरटी मार्गावरील स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हे सिग्नल सुरू नसतात. तसेच क्राँसिंगच्या ठिकाणी रात्री सिग्नल बंद आहेत. ऑटोमेटिक यंत्रणा नावालाच असल्याचे दिसून येते.