पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:20 PM2020-09-05T16:20:38+5:302020-09-05T16:22:37+5:30

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर दोन वर्षांत शहराला लाभलेले ते तिसरे पोलीस आयुक्त आहेत..

Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishna Prakash took charge | पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारला 

पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारला 

googlenewsNext
ठळक मुद्देसंदीप बिष्णोई हे 'कॅट'मध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम

पिंपरी : शहराचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. ५) दुपारी संदीप बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर दोन वर्षांत शहराला लाभलेले ते तिसरे पोलीस आयुक्त आहेत. आपण कॅटमध्ये जाणार नसून, शासन देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे संदीप बिष्णोई यांनी या वेळी सांगितले. 

औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. आर. के. पद्मनाभन पहिले तर दुसरे पोलीस आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांनी कमी मनुष्यबळात आयुक्तालयाचा गाडा हाकला. शहराचे तिसरे आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांची २ सप्टेंबर रोजी नियुक्ती झाली. मात्र मुदतपूर्व बदली झाल्याने बिष्णोई कॅटमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात कृष्ण प्रकाश यांनी लागलीच पदभार न घेतल्याने या चर्चेने अधिक जोर धरला. मात्र कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी आयुक्तालयात हजर होत बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला.  

कॅटमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम
संदीप बिष्णोई यांची गेल्या वर्षी अर्थात २० सप्टेंबर २०१९ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २१ सप्टेंबर रोजी त्यांनी आर. के. पद्मनाभन यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. एक वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वीच बिष्णोई यांची बदली करण्यात आली. मुदतपूर्व बदली झाली म्हणून, बिष्णोई केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकीकरणकडे (कॅट) धाव घेणार असल्याची चर्चा होती. तसेच त्याबाबतचा सही नसलेला एक ‘ड्राफ्ट’ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपण कॅटकडे जाणार नसून, शासन देईल ती जबाबदारी सांभाळणार आहोत, असे बिष्णोई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मुंबईत पोस्टिंगची शक्यता
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्त होण्यापूर्वी संदीप बिष्णोई हे मुंबई येथे वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक होते. मुंबई येथे कुटुंबिय असून, तेथे काम करण्यास आवडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे त्यांची मुंबई येथे महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होऊन मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली जाऊ शकते

Web Title: Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishna Prakash took charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.