पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्ष लांडगेंना अंतरिम जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:25+5:302021-08-24T04:14:25+5:30
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेडील वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठीची निविदा मंजूर होऊनही होर्डिंगची वर्क ऑर्डर काढण्याकरिता १० लाख ...
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेडील वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठीची निविदा मंजूर होऊनही होर्डिंगची वर्क ऑर्डर काढण्याकरिता १० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना न्यायालयाने सोमवारी (दि. २३) अंतरिम जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
लाच प्रकरणात लांडगे यांच्यासह त्यांचा स्वीय सहायक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर, पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव, वाकड) आणि लिपिक विजय शंभूलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. ॲड. प्रताप परदेशी आणि ॲड. गोरक्षनाथ काळे यांनी लांडगे यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणात तपास पूर्ण झालेला आहे. अर्जदार लांडगे यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.
कौटुंबिक कारणासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. परदेशी आणि ॲड. काळे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने लांडगे यांना २६ ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गुरुवारी (दि. २६) सकाळी ११ वाजेपर्यंत न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींची न्यायालयाने न्यायालयीन येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. त्यांनी देखील जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर बुधवारी (दि. २५) सुनावणी होणार आहे. इतर आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग, ॲड. कीर्ती गुजर, ॲड. संजय दळवी यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेंदळे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.