पिंपरी चिंचवड शहरात रविवारी २ हजार २६५ नवे कोरोनाबाधित, तर २ हजार २७ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 08:09 PM2021-04-25T20:09:28+5:302021-04-25T20:10:02+5:30
शहरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ७२ हजार ६७९
पिंपरी: कोरोनाचा आलेख कालपेक्षा दोनशेंनी कमी झाला आहे. दिवसभरात २ हजार २६५ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार २७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४९जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आठ हजार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत दोन लाख रुग्णांचा टप्पा गाठला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २ हजार ४०० वर आलेली रुग्णसंख्या दोनशेंनी कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ९ हजार ५८३ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ६ हजार ८०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार ६६२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ८ हजार २७९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ९ हजार ३१० जणांना डिस्चार्ज दिला आहे.
कोरोनामुक्त वाढले दोनशेंनी
कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दोनशेंनी वाढली आहे. आज बाधित रुग्णांपेक्षा दोनशे जण कमीने कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ७२ हजार ६७९ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ६६७ वर गेली आहे.
४९ जणांचा मृत्यू
कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या कालच्या एवढीच आहे. शहरातील ५९ आणि शहराबाहेरील ३५ अशा एकूण ९४ जणांचा बळी घेतला आहे. त्यात तरुण आणि महिलांची, ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ६६९ वर पोहोचली आहे.
लसीकरणाचा वेग कमी
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. महापालिकेच्या ६४ आणि खासगी २२ अशा एकूण ८६ लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिकेतील केंद्रावर ७ हजार ७७३ तर खासगी रुग्णालयात ८९७ अशा एकूण ८ हजार ३७० जणांचे लसीकरण करण्यात आले तर ४५ वर्षांवरील ६ हजार ९०४ जणांना लस देण्यात आली आहे.