पिंपरी-चिंचवडच्या टीडीआर घोटाळ्याची ‘ईडी’कडे तक्रार, संभाजी ब्रिगेडकडून चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 10:55 AM2023-12-21T10:55:38+5:302023-12-21T10:55:47+5:30
केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हस्तक्षेप करून या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली...
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोट्यवधीचा टीडीआर घोटाळा झाला आहे. त्याची चर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनात झाली असून, या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हस्तक्षेप करून या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली.
याबाबत काळे यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वाकड, भूमकर चौकाजवळ महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणाचा भूखंड विकसित करण्याच्या प्रकल्पात हा घोटाळा अधिकाऱ्यांनी केलेला आहे. बांधकाम खर्च अडीचपट वाढवून संबंधित विकासकाला ॲमिनिटी टीडीआरमध्ये मोठी वाढ करून देण्याचा प्रयत्न यामध्ये झालेला आहे. या माध्यमातून मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे आरोप हिवाळी अधिवेशनात करण्यात आले.
प्रशासनाने पारदर्शक कारभार करून भ्रष्टाचार रोखणे आवश्यक आहे. तसे असताना पिंपरी महापालिकेत प्रशासकीय यंत्रणा नियमांची पायमल्ली करून शासनाची आणि करदात्या नागरिकांची फसवणूक करत आहे. या प्रकरणाची माहिती उपलब्ध करून दिली जात नाही. महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्या कार्यकाळात जेवढे टीडीआर वाटप करण्यात आले, त्यामध्येही मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी गायकवाड यांची चौकशी करण्यात यावी, असे काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.