पिंपरी-चिंचवडला डावलणे अन्यायकारक

By admin | Published: September 23, 2015 03:38 AM2015-09-23T03:38:49+5:302015-09-23T03:38:49+5:30

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे पहिल्या तीन क्रमांकांत असतानाही केवळ पुण्याचा समावेश करून पिंपरी-चिंचवड शहर वगळणे

Pimpri-Chinchwad is unfair | पिंपरी-चिंचवडला डावलणे अन्यायकारक

पिंपरी-चिंचवडला डावलणे अन्यायकारक

Next

पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे पहिल्या तीन क्रमांकांत असतानाही केवळ पुण्याचा समावेश करून पिंपरी-चिंचवड शहर वगळणे हा दोन्ही शहरांतील नागरिकांचा अपमान असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी पुण्यात केली. महापालिकेच्या वतीने आयोजित शनिवार वाडा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, नगरसेविका शारदा ओरसे, लक्ष्मी घोडके, सुनंदा गडाळे या वेळी उपस्थित होत्या.
मुंडे म्हणाले, ‘‘पुण्याची ओळख देशाला नव्हे, तर जगाला आहे. वेगाने विकसित होणारी शहरे पुणे आणि पिंपरी आहेत. पिंपरी-चिंचवड तर देशाची औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. असे असतानाही राज्य शासनाने ही दोन्ही शहरे एकत्रितपणे स्मार्ट सिटीसाठी पाठविली. विशेष म्हणजे, ही दोन्ही शहरे पहिल्या तिनांमध्ये असतानाही केंद्राकडून पिंपरी-चिंचवडला डावलले गेले ही अन्यायकारक बाब आहे.’’
शनिवार वाडा महोत्सवाने पुण्याची संस्कृती जपण्याचे काम केले असल्याचे सांगून या पुढे जाऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पुणेकरांनी मदत करून नवा आदर्श घालून द्यावा, अशी मागणी या वेळी मुंडे यांनी उपस्थितांना केली. महोत्सवाचे उद्घाटन गणेशवंदना आणि ढोलताशा पथकाच्या वादनाने करण्यात आली. महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त जल्लोष सिनेतारकांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Pimpri-Chinchwad is unfair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.