पिंपरी-चिंचवड झाले महाग
By admin | Published: April 2, 2017 02:51 AM2017-04-02T02:51:47+5:302017-04-02T02:51:47+5:30
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शनिवारपासून लागू केलेल्या रेडिरेकनरच्या (वार्षिक मूल्यदर) दरानुसार पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक वाढ
पिंपरी : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शनिवारपासून लागू केलेल्या रेडिरेकनरच्या (वार्षिक मूल्यदर) दरानुसार पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक वाढ जिल्ह्यात झाली आहे. जिल्हामध्ये ८.६० टक्के, शहरात ३.६४ टक्के तर पिंपरी चिंचवडमध्ये ४.४६ टक्के दरवाढ करण्यात आली ७१ झोनमध्ये शून्य टक्के वाढ आहे.
नव्या दरवाढीनुसार शहरातील सर्वात महागडा भाग कोरेगाव पार्क ठरला आहे. तर त्याखालोखाल प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, शिवानीनगर, मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ (कुमठेकर रस्ता-विश्रामबाग वाडा), नारायण पेठ आणि बुधवार पेठेलगतचा लक्ष्मी रस्त्याच्या भागाला सर्वाधिक भाव मिळाला आहे. उपनगरातील औंध-बाणेर, एरंडवणा या भागाने सर्वाधिक दर कायम ठेवला आहे. कोरेगाव पार्क भागात १ लाख ४७ हजार ८६० प्रती चौरस मिटर, प्रभात रस्त्यावर १ लाख ३९ हजार ८६० प्रति चौरस मिटर, कोथरुडमध्ये १ लाख २० हजार २१० प्रती चौरस मिटर तर शिवाजीनगरमध्ये १ लाख १८ हजार १३० प्रती चौरस मिटरचा भाव आहे. ज्या भागात खरेदी विक्री अधिक प्रमाणात झालेली आहे त्याच भागात आवश्यक तशी वाढ करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात १५.३ टक्के तर प्रभाव क्षेत्रात ७.८१ टक्के, नगरपालिक व नगर परिषद ७.२४ टक्के वाढ आहे. जिल्ह्यात ८.६० टक्के दरवाढ झाली आहे. हे व्यवहार वाढीव दराने होत असल्यामुळे यंदा दरवाढ सुुुचविण्यात आली आहे. शहरालगतच्या हवेली, मुळशी, वडगाव मावळ या तालुक्यांमधील निम्मा भाग महापालिका क्षेत्रांना जोडण्यात आलेला आहे. उर्वरीत ग्रामीण हद्दीतील क्षेत्रासह उपनगरांमध्ये विकासाच्या संधी लक्षात घेता रेडिरेकनरचा दर अधिक ठेवले आहे. (प्रतिनिधी)