Pimpri Chinchwad: मोबाइल चोरीची तक्रार देण्यास गेला अन् दुचाकीही गमावून बसला

By नारायण बडगुजर | Published: July 26, 2023 07:49 PM2023-07-26T19:49:30+5:302023-07-26T19:59:25+5:30

भोसरी येथे २० जुलै रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या कालावधीमध्ये हा प्रकार घडला...

Pimpri Chinchwad: Went to file a mobile theft complaint and also lost the bike | Pimpri Chinchwad: मोबाइल चोरीची तक्रार देण्यास गेला अन् दुचाकीही गमावून बसला

Pimpri Chinchwad: मोबाइल चोरीची तक्रार देण्यास गेला अन् दुचाकीही गमावून बसला

googlenewsNext

पिंपरी : घरी बोलण्यासाठी फोन करायचा म्हणून एका अनोळखी व्यक्तीने तरुणाचा मोबाईल घेऊन तो फोन चोरून नेला. त्याची तक्रार देण्यासाठी दुचाकीवरून जात असताना तरुणाची दुचाकी देखील चोरट्याने पळवून नेली. पीएमटी चौक, भोसरी आणि साई सागर हॉटेल, भोसरी येथे २० जुलै रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या कालावधीमध्ये हा प्रकार घडला.

सोमनाथ प्रकाश वाघ (वय २९, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमटी चौक भोसरी येथे एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांच्याकडे घरी फोन करण्यासाठी फोन मागितला. फिर्यादीने विश्वासाने अनोळखी व्यक्तीला फोन दिला. मात्र तो अनोळखी व्यक्ती गर्दीचा फायदा घेत मोबाईल घेऊन पळून गेला. तसेच फिर्यादीच्या मोबाईलमधून तीन हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.

मोबाइल चोरीच्या या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात होते. ते पुणे - नाशिक महामार्गावरील साई सागर हॉटेल, भोसरी येथे आले असता त्यांनी दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला भोसरी पोलिस ठाण्याचा पत्ता विचारला. त्यावर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने पत्ता सांगण्याचा बहाणा करून विश्वास संपादन केला. भोसरी पोलिस स्टेशन जवळच आहे. तेथे माझी खूप ओळख आहे. मी तेथील पोलिसांना सांगून तुला मदत करायला सांगतो, असे म्हणत दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला पान टपरीवरून सिगारेट घेऊन येण्यास पाठवले. त्यानंतर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादीची दुचाकी घेऊन पळ काढला, असे फिर्यादीत नमूद आहे.  

मोबाइल पाठोपाठ दुचाकीही चोरीला गेल्याने फिर्यादीने भोसरी पोलिस ठाणे गाठले. त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Pimpri Chinchwad: Went to file a mobile theft complaint and also lost the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.