पिंपरी-चिंचवडचे पाप आळंदीत नको
By admin | Published: March 28, 2017 02:24 AM2017-03-28T02:24:34+5:302017-03-28T02:24:34+5:30
पिंपरी-चिंचवड मधील पाप अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत वाहत असल्याने इंद्रायणीची खरोखरच वाट
शेलपिंपळगाव : पिंपरी-चिंचवड मधील पाप अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत वाहत असल्याने इंद्रायणीची खरोखरच वाट लागली आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडची घाण इंद्रायणी नदीत जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
आळंदी देवाची येथे आयोजित स्वानंद सुखानिवासी सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, शांतिब्रह्म गुरुवर्य हभप मारुतीमहाराज कुरेकर, आमदार संजय भेगडे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार उल्हास पवार, महापौर नितीन काळजे, रामायणाचार्य रामरावजीमहाराज ढोक, बबनराव पाचपुते, विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, अध्यक्ष संदीपानमहाराज पाटील हासेगावकर आदींसह अन्य मान्यवर तसेच लाखो भाविकांची मांदियाळी उपस्थित होती.
मुख्यमंत्री म्हणाले, आळंदीत अशुद्ध पाण्याचा भाविकांना सामना करावा लागत आहे. आळंदी व पिंपरी-चिंचवडमधील समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे पुण्य आमच्या वाट्याला यावे, म्हणूनच या दोन्ही ठिकाणची सत्ता नागरिकांनी भाजपाकडे सुपूर्त केली आहे. तेव्हा पिंपरीतील पाप इकडे येऊ नये याची काळजी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे यांनी घ्यावी,
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘१३व्या शतकापासूनच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी संपूर्ण जगाच्या कल्याणाचा शाश्वत विचार करून जागतिकीकरणाची नांदी समोर मांडली होती. वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र घडत आहे.’’
रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांनी प्रास्ताविक केले. संदीपानमहाराज पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
निर्णय : जागेवर आरक्षण राहणार नाही
आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या जागेवर टाकलेले आरक्षण काढण्यासंदर्भात आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या जागेवर कोणतेही आरक्षण राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
एक कोटीची देणगी
‘फीविना विद्यार्थी व पगाराविना शिक्षक’ असे सूत्र असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी राज्य सरकार सदैव तत्पर असल्याचे सांगून राज्य सरकारच्या वतीने १ कोटी रुपयांची देणगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
समाजात शिक्षणाचा व्यापार होऊ लागला आहे. मात्र, मागील शंभर वर्षांत वारकरी शिक्षण संस्थेने विनामोबदला चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे. परिणामी, समाजात स्वच्छ परिवर्तनाची लाट निर्माण होऊ लागली आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक