पिंपरीत नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याचे सत्र सुरूच, विनामास्क फिरणाऱ्या ४६३ नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 07:04 PM2021-04-19T19:04:09+5:302021-04-19T19:04:16+5:30
विकेंड लॉकडाऊनमधेही विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले
पिंपरी: विकेंड लाॅकडाऊन असतानाही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत आहेत. शहरात अशाप्रकारे विनामास्क फिरणाऱ्या ४६३ नागरिकांवर पोलिसांनी रविवारी कारवाई करण्यात आली.
शहरात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरीत दररोज २, ३ हजारांच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात बेड न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण या दोन दिवसातही नागरिक घराबाहेर येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामध्येही नागरिकांना कोरोनाचे अजिबात गांभीर्य नसून ते सर्रास नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध कडक केले असून, त्याचे नागरिकांनी पालन करावे, घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासन व पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पोलीस ठाण्यांतर्गत झालेली कारवाई
एमआयडीसी भोसरी (७९), भोसरी (८०), पिंपरी (०४), चिंचवड (४६), निगडी (४९), आळंदी (१४), दिघी (१४), सांगवी (१६), वाकड (२९), हिंजवडी (२१), देहूरोड (१८), तळेगाव दाभाडे (३४), तळेगाव एमआयडीसी (०१), चिखली (०८), रावेत चौकी (४९), शिरगाव चौकी (०१) या पोलीस ठाण्यांतर्गत रविवारी ४६३ नागरिकांवर कारवाई झाली.