Pimpri Crime : भर दिवसा खून करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन गाठले पोलिस ठाणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:06 PM2024-11-26T21:06:32+5:302024-11-26T21:06:32+5:30

पिंपरी : आर्थिक नुकसानीचा राग मनात धरून भर दुपारी उद्योजकाने कुऱ्हाडीने वार करून एकाचा खून केला. त्यानंतर रक्ताने माखलेली ...

Pimpri Crime After killing in broad daylight, he reached the police station with an ax covered in blood  | Pimpri Crime : भर दिवसा खून करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन गाठले पोलिस ठाणे 

Pimpri Crime : भर दिवसा खून करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन गाठले पोलिस ठाणे 

पिंपरी : आर्थिक नुकसानीचा राग मनात धरून भर दुपारी उद्योजकाने कुऱ्हाडीने वार करून एकाचा खून केला. त्यानंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन त्याने पिंपरी पोलिस ठाणे गाठले. मी खून केला आहे, असे त्याने पाेलिसांना सांगितले. पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात मंगळवारी (दि. २६) दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

महेश सुंदरदास मोटवाणी (४६, रा. गेलार्ड चौक, पिंपरी), असे खून झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राम गोपीचंद मनवानी (४१, रा. गेलार्ड चौक, पिंपरी), असे संशयिताचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मनवानी आणि महेश मोटवाणी या दोघांचेही कुटुंब पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात एकमेकांच्या शेजारी राहतात. राम मनवानी याची ॲल्युमिनियम फाॅईलची फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीमध्ये महेश मोटवाणी हे कामाला होते. महेश यांच्यामुळे फॅक्टरीमध्ये आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यामुळेच मी दिवाळखोर झालो, असे राम मनवानी याचे म्हणणे होते. महेश यांच्यामुळेच माझे आर्थिक नुकसान झाले, असा त्याचा आरोप होता. त्यातून महेश आणि राम या दोघांमध्ये वादाचे प्रकार घडले.

दरम्यान, महेश हे एका ऑनलाइन कंपनीसाठी ‘फूड डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करत होते. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास फूड डिलिव्हरीच्या कामासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी राम मनवानी हा हातात कुऱ्हाड घेऊन थांबला होता. महेश हे घराबाहेर पडताच राम याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात महेश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. 

महेश यांच्यावर वार केल्यानंतर राम हा रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. मी खून करून आलोय, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिस अवाक झाले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. 

दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेश मोटवाणी यांना काही नागरिकांनी पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान महेश यांचा मृत्यू झाला.

Web Title: Pimpri Crime After killing in broad daylight, he reached the police station with an ax covered in blood 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.