पिंपरी, पुण्यातील गिर्यारोहक सुरक्षित

By Admin | Published: April 27, 2015 04:58 AM2015-04-27T04:58:07+5:302015-04-27T04:58:07+5:30

नेपाळमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने मोठ्या प्रमाणात हिमकडे कोसळून माउंट एव्हरेस्ट मोहिमेच्या मार्गातील दोन बेस कॅम्प बर्फाच्या

Pimpri, mountaineer safe in Pune | पिंपरी, पुण्यातील गिर्यारोहक सुरक्षित

पिंपरी, पुण्यातील गिर्यारोहक सुरक्षित

googlenewsNext

पिंपरी : नेपाळमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने मोठ्या प्रमाणात हिमकडे कोसळून माउंट एव्हरेस्ट मोहिमेच्या मार्गातील दोन बेस कॅम्प बर्फाच्या ढिगाऱ्याबरोबर वाहून गेले आहेत. मात्र, पुण्यातून गेलेले काही गिर्यारोहक सुरक्षित असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड माउंटेनिअरिंग असोसिएशनचे सचिव सुरेंद्र शेळके यांनी ‘लोकमत’ला दिली. या सर्वांशी संपर्क झाल्याचे सांगून गिर्यारोहकांच्या नातेवाइकांनी काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नाईलाजास्तव चढाईची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गिर्यारोहक नाराज झाले असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
नेपाळमध्ये शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास झालेल्या भूकंपाने माउंट एव्हरेस्ट मोहिमेच्या मार्गातील दोन बेस कॅम्प बर्फाच्या ढिगाऱ्याबरोबर वाहून गेले. मोठ्या प्रमाणात हिमकडे कोसळले. त्यामध्ये अनेक गिर्यारोहक गाडले गेले असल्याची शक्यता आहे.
पुण्यातून असोसिएशनच्या वतीने चीनमार्गे व नेपाळमार्गे अशा दोन व्यक्तिगत मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच, सरावासाठीही अनेक जण मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांत धनकवडी, पुणे येथील किशोर धनकुडे याचा समावेश आहे. गेल्या वर्षी त्याने चीनमार्गे मोहीम यशस्वी केली होती. यंदा तो दक्षिण मार्गाने मोहीम करीत होता.
औरंगाबादचा रफिक शेख हा पोलीस दलातील गिर्यारोहक सुरक्षित आहे. मुंबईतील ५२ वर्षांचे शरद कुलकर्णी आणि ५० वर्षांच्या अंजली कुलकर्णी हे दाम्पत्य पुढील वर्षी माउंट एव्हरेस्ट मोहीम आखणार आहेत. त्याच्या सरावासाठी ते तेथे लोगोशी हे ६ हजार ५० मीटर उंचीचे शिखरचढाईची मोहीम करीत होते. मुंबईचा कुणाल जोशहर हा माउंट एव्हरेस्टच्या मोहिमेत होता. गिर्यारोहक सचिन शिंदे लोगोशी शिखर मोहिमेसाठी निघाला होता. दिल्लीत पोहोचल्यानंतर हा प्रकार घडल्याने तो परतला आहे.
सध्याची स्थिती मोहीम पूर्ण करण्याची तयारी काही गिर्यारोहकांनी केली आहे. मात्र, सद्य:स्थिती पाहता मोहिमा अर्धवट सोडून माघारी फिरण्याची जास्त शक्यता आहे. साधारणत: एका मोहिमेसाठी प्रत्येकी १८ ते २० लाख रुपये खर्च येतो. नाइलाजास्तव अर्धवट सोडावी लागत असल्याने याने खटाटोप करून उभी केलेली ही रक्कम वाया जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pimpri, mountaineer safe in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.