स्मार्ट सिटीत पिंपरीला संधी
By admin | Published: December 25, 2016 04:49 AM2016-12-25T04:49:48+5:302016-12-25T04:49:48+5:30
स्मार्ट सिटी योजनत समावेश न झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला या योजनेत परतण्याची संधी देत असल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी शनिवारी जाहीर
पुणे : स्मार्ट सिटी योजनत समावेश न झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला या योजनेत परतण्याची संधी देत असल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी शनिवारी जाहीर केले. पुणे पालिकेचे मार्गदर्शन घेऊन आता पिंपरी चिंचवड पालिकेने या योजनेत अव्वल यावे असे आवाहन त्यांनी केले.
शनिवारी पुणे मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलताना नायडू यांनी त्यांच्या भाषणात पिंपरी-चिंचवडची खास दखल घेतली. व्यासपीठावर उपस्थित महापौर शंकुतला धराडे यांचा सिस्टर असा उल्लेख करून ते नायडू म्हणाले,‘‘ त्या सिस्टर आहेत व त्यांची सिटी पुण्याची सिस्टर सिटी आहे. स्मार्ट सिटी योजनेत राज्य सरकारने पुणे व पिंपरी चिंचवड असा संयुक्त प्रस्ताव पाठविला होता. असा प्रस्ताव मंजूर करणे नियमात बसत नव्हते, त्यामुळे पिंपरी-चिंचवडला बाजूला करावे लागले. त्यातून नाराजी निर्माण झाली, देवेंद्र फडणवीस यांनी फार आग्रह धरला, त्यांना सांगितले नियम मोडता येणार नाही. पण त्यांच्याजवळ बरेच उपाय आहेत. त्यातील काही त्यांनी सांगितले. त्यातून आता आता या शहराला स्मार्ट सिटी स्पर्धेत राहिलेल्या उर्वरित शहरांबरोबर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’
पुणे शहराने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे असा उल्लेख करून नायडू म्हणाले,‘‘ लोकसहभागाचे चांगले उदाहरण त्यांनी दाखविले. पिंपरी-चिंचवड ने आता त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, योजनेचा अभ्यास करावा, नागरिकांना काय हवे ते जाणून घ्यावे. चांगला तयार करून तो सादर करावा व स्पर्धेत अव्वल यावे.’’
फक्त भारतातच नाही तर जगातील सर्व देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्री मोदी यांचा गौरव होत आहे, त्यांचेच नाव जगभर घेतले जात आहे याचे कारण ते बदल करीत आहेत. सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी लगेच आम्हाला सांगितले की काही केले नाही, काही बोलला नाही म्हणून कोणी आपल्याला चांगला माणूस आहे असे म्हणू नये. सत्ता चांगल्या कामासाठी राबवायची असाच त्यांचा विचार आहे.
स्वच्छ भारत म्हणजे फक्त कचरा स्वच्छ करायचा नाही. तन, मन आणि धन हे सगळेच स्वच्छ पाहिजे. तन मन झाले आता धन स्वच्छ करण्याचे सुरू आहे असे नायडू म्हणाले. देशातील काळा पैसे ज्यांनी ६० वर्षे सत्ता राबविली त्यांनी केला की
ज्यांना सत्तेवर येऊन २ वर्षे झाली त्यांनी केला असा सवाल नायडू यांनी केला.(प्रतिनिधी)