पिंपरीपेंढारचा विराट कोेहली!; अरे, यह तो हमशकल है, कोहलीनेही दिली पावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 06:07 PM2017-12-29T18:07:50+5:302017-12-29T18:18:16+5:30
पुणे जिल्ह्यातील पिंपरीपेंढारच्या ‘विराट’चीही सुरू आहे. क्रिकेट हे त्याचे पॅशन नसले तरी शेतात राबणारा हा तरुण सध्या सेम टू सेम विराटसारखा दिसत असल्याने चांगलाच प्रसिद्धीस आला आहे.
गोकुळ कुरकुटे
आळेफाटा : जगात एका चेहऱ्याची सात माणसं असतात, असे म्हणतात. कुर्डुवाडीच्या राजेश खन्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे, तशीच पुणे जिल्ह्यातील पिंपरीपेंढारच्या ‘विराट’चीही सुरू आहे. क्रिकेट हे त्याचे पॅशन नसले तरी शेतात राबणारा हा तरुण सध्या सेम टू सेम विराटसारखा दिसत असल्याने चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. स्वत: विराट कोहलीनेही त्याला ‘अरे, ये तो मेरा हमशकल है,’ अशी पावती दिली आहे.
सिद्धेश जाधव असे त्याचे नाव. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार त्याचे छोटेसे गाव. तो पदवीधर असून शेतात राबणारा सिद्धेशचे क्रिकेट हे पॅशन नसले तरी त्याची त्याला लहानपणापासूनच आवड आहे.
बारावीपर्यंत त्याला तो विराटसारखा दिसतो, याची ओळख झाली नव्हती. २०१४ या वर्षी अण्णासाहेब वाघिरे कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना त्याची पहिल्यांदा ओळख एका मुलीनेच करून दिली. त्या वेळी विराट कोहलीची एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यात त्याचा डुप्लिकेटही दाखवला होता. या काळात ही जाहिरात क्रिकेटप्रेमी संजीवनी शिंदे या मुलीने पाहिली आणि तिने सिद्धेशला अरे, तू तर विराटसारखा दिसतोस, असे सांगितले. तेव्हा खरे त्याला तो विराटसारखा दिसतो, याची ओळख झाली आणि हळूहळू तो विराट नावानेच तालुक्यात प्रसिद्ध होऊ लागला.
सिद्धेशने त्याची लाईफस्टाईलही विराटसारखी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तो सकाळी उठला, की फिटनेसला प्राधान्य देतो. विराट त्याच्या चेहऱ्याचा लुक जसा बदलतो, तसा तोही बदलण्याचा प्रयत्न करतो. सिद्धेशचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून शेती व जोडधंदा म्हणून पोल्ट्री व शेळीपालन तो करतो.
क्रिकेट त्याचे पॅशन नसले तरी त्याची लहानपणापासूनची आवड आहे. विराटच्या इनिंग तो न चुकवता पाहतो. तेथील राणेश्वर स्पोर्ट्स क्लबकडून तो सध्या स्थानिक क्रिकेट खेळत आहे. तो मैैदानावर असला, की विराट विराटची गुंजही मैदानात असते.
पिंपरी-चिंचवड येथे राहणारे व मूळ पिंपरीपेंढार येथील रोहित खर्गे यांनी खरं तर या ‘सेम टू सेम’ विराटला सोशल मीडियावर आणलं. विराटबरोबर भेटीचा फोटो त्यांनी फेसबुकवर टाकल्यानंतर जास्त प्रसिद्धीच्या झोतात आल्याचे सिद्धेश सांगतो. विराट कोहली देशासाठी खेळतो, तर विराटसारखीच हमशकल असणारा माझा सिद्धेशने शेतीमध्ये व गावासाठी काम करून स्वत:चे नाव कमवावे, अशी अपेक्षा सिद्धेशची आई वंदना जाधव यांनी व्यक्त केली.
आता नावच विराट ठेवणार
अलीकडे विराट नाव इतके कानावर पडते, की स्वत:चे नावच बदलून विराट असे ठेवणार असल्याचे सिद्धेशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
यह तो मेरा हमशकल है!
सिद्धेशचे विराट कोहलीला भेटण्याचे स्वप्न होते. त्याचे ते स्वप्न हॉटेल ओबेरायमध्ये गावातीलच सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणाऱ्या भूषण तपासे यांनी पूर्ण केले. १७ डिसेंबर २०१६ रोजी भारत- इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान हॉटेलमध्ये तपासे यांनी सिद्धेशची विराटशी भेट घडवून आणली. सिद्धेश विराटला भेटण्यासाठी गेला असता, त्याला पाहून, ये तो मेरा हमशकल है! असे म्हटल्याने सिद्धेशला सेम टू सेम असल्याची खरी पोहोचपावती मिळाल्याचे सिद्धेश सांगतो. या वेळी विराटने त्याची आस्थापूर्वक विचारपूस केली व ‘क्रिकेट खेलता है क्या’ असे विचारले.