पिंपरी पोलिसांच्या मोटारीला मिझोराममध्ये अपघात
By admin | Published: February 9, 2015 04:01 AM2015-02-09T04:01:44+5:302015-02-09T04:01:44+5:30
खुनाच्या तपासासाठी मिझोराम येथे गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या मोटारीला अपघात झाला. या अपघातात एका फौजदारासह दोन हवालदार जखमी झाले.
पिंपरी : खुनाच्या तपासासाठी मिझोराम येथे गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या मोटारीला अपघात झाला. या अपघातात एका फौजदारासह दोन हवालदार जखमी झाले. ट्रकने धडक दिल्यानंतर मोटार रस्त्याकडेला अडकल्याने मोटार खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. यामुळे तिघेही बचावले. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मिझोरममधील कोलासीबजवळील बोप्तीयाल येथील घाटात घडली.
फौजदार हरीश माने, हवालदार उत्तम पठारे, दादा धस अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी आॅटो क्लस्टर येथे झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी पोलिसांचे पथक महाराष्ट्राबाहेर मिझोरमला जाण्यासाठी ३ फेबु्रवारीला रवाना झाले. रेल्वेने कलकत्ता, गुवाहाटीमार्गे शुक्रवारी आसाममधील सिंचर येथे पोहोचले. तेथून पुढे मिझोरम येथील कोलासीब येथे जायचे होते. मात्र, लोहमार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने वेळेत रेल्वे उपलब्ध नव्हती. तर खासगी प्रवासी बस केवळ सायंकाळच्या वेळी असल्याने पिंपरी पोलीस शनिवारी सकाळी खासगी मोटारीने कोलासीब येथे जाण्यासाठी निघाले. हे अंतर ९० किलोमीटरचे आहे.
सकाळी अकराच्या सुमारास बुख्तीयाल गावाजवळील घाटातून जात असताना नागमोडी वळणावर मोटारीसमोर अचानक एक भरधाव वेगातील ट्रक आला. पोलिसांच्या चालकाने मोटार जागेवरच थांबविली. त्यानंतर भरधाव ट्रक मोटारीला समोरच्या बाजूने धडकला. त्यामुळे मोटार मागे सरकून दरीच्या दिशेने गेली. त्यानंतर मोटारीचा काही भाग दरीत तर काही भाग रस्त्यावर अशी अवस्था झाली होती. या अपघातात मोटारीत पुढे चालकाच्या शेजारील आसनावर बसलेले पठारे यांच्या डोळ्याला जखम झाली, तर मागील आसनावरील फौजदार माने यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांच्या शेजारीच बसलेले धस यांच्या पायाला व बरगडीला मार लागला. (प्रतिनिधी)