पिंपरी पोलिसांची मान शरमेने खाली गेली, जेव्हा दारू विक्रेत्यांनी "खाकी वर्दी" ची कॉलर धरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:55 PM2021-04-08T12:55:58+5:302021-04-08T12:56:46+5:30
दारू विक्री करणाऱ्यांनी झटापट करून पकडली पोलिसाची कॉलर
पिंपरी: समाजाचे रक्षक असणाऱ्या पोलीस बांधवांची मान शरमेने खाली गेली आहे. घरातच दारूची विक्री करत असलेल्यांनी पोलिसांचीच कॉलर पकडून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार निगडी येथे घडला आहे. घरात विदेशी दारू बिअरच्या बाटल्या बाळगून त्याची विक्री करीत असलेल्यांना पोलिसांनी पकडले. यावेळी कारवाई करू नये म्हणून पोलिसांशी झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. याप्रकरणी मुळचे नेपाळ येथील असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
करण भरत सोनार (वय २३), अर्जुन भरत सोनार (वय २०), दीपेश भरत सोनार (वय १९), भरत अमर सोनार (वय ४५), मनीषा भरत सोनार (वय २२), गीता भरत सोनार (वय ४०, सर्व रा. प्राधिकरण निगडी, मुळगाव मोगलसेन, जि. आच्छाम, नेपाळ), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार सतीश ढोले यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संगनमत करून राहत्या घरामध्ये विदेशी दारू व बिअरच्या ९७ हजार १४५ रुपये किमतीच्या ५१८ बाटल्या जवळ बाळगून त्याची लोकांना विक्री करत होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपींना पकडले. पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून आरोपी करण सोनार याने सतीश ढोले यांची कॉलर पकडली. इतर आरोपींनी शिवीगाळ तसेच दमदाटी केली. कारवाई करू नये म्हणून आरडाओरड व गोंधळ करुन पोलिसांशी झटापट केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.