पिंपरी आरटीओ च्या ढिसाळ कारभाराचा दोन तालुक्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:05 AM2020-12-02T04:05:36+5:302020-12-02T04:05:36+5:30
नारायणगाव : लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व कामकाज सुरळीत झाल्यानंतर देखील पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका जुन्नर आंबेगाव ...
नारायणगाव : लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व कामकाज सुरळीत झाल्यानंतर देखील पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील नागरिकांना बसत आहे , कोणतेही काम वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .
पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय अंतर्गत मावळ , मुळशी , हवेली , खेड , आंबेगाव , जुन्नर तालुके येतात , या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाहन मालक वाहनांच्या विविध कामासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येत असतात . महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त महसूल देणारे पिंपरी चिंचवड कार्यालय आहे , मात्र लॉकडाऊननंतर कार्यालय चालू केल्यानंतर नागरिकांचे कोणतेही काम वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. वाहन मालकांनी बँका , पतसंस्था मार्फत वाहन तारण ठेवून कर्जप्रकरणे केली होती. यासाठी सदर वित्त संस्थांचा गाडीवर उपप्रादेशिक परिवहन विभाग मार्फत बोजा नोंद केला जातो. मात्र ऐन दिवाळीत उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात कागदपत्रे सादर करून सुद्धा बोजा नोंद झाली नाही, याचा अनेकांना ऐन दिवाळीत फटका बसला.
उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाकडून नागरिकांना वेळेवर लायसन्स मिळाले नसल्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे . सुमारे सात हजार नागरिकांना लायसन्स मिळण्याची बाकी असल्याचे समजते.
याबाबत पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात संपर्क साधला असता संबंधित अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याचे सांगण्यात आले .
आरटीओ कार्यालयामध्ये सर्व सुविधा अद्यावत असतानासुद्धा नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे . याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी.
अतुल बेनके , आमदार , जुन्नर तालुका .
पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या असून या ठिकाणचे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांचे अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींचा फोन घेण्यास सुद्धा टाळाटाळ करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे , अशा अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे करणार आहोत.
दिलीप मोहिते आमदार खेड तालुका .
प्रत्येक अधिकारी हा लोकसेवक असतो सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणे यास सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे .पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाने आपला कारभार व्यवस्थित सुधारला नाही तर याबाबत जनतेचे हित लक्षात घेऊन तीव्र जनआंदोलन करू .
- मकरंद पाटे जिल्हा उपाध्यक्ष मनसे