पिंपरीत युवती सेना प्रमुख प्रतीक्षा घुलेंच्या सांगण्यावरून महिलेला मारहाण; जेसीबीच्या साहाय्याने घरही पाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 08:38 PM2022-01-09T20:38:32+5:302022-01-09T20:40:14+5:30

युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख पदी असलेल्या महिलेच्या सांगण्यावरून घर पाडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद

Pimpri Yuvati Sena chief Pratiksha Ghule beats up a woman | पिंपरीत युवती सेना प्रमुख प्रतीक्षा घुलेंच्या सांगण्यावरून महिलेला मारहाण; जेसीबीच्या साहाय्याने घरही पाडले

पिंपरीत युवती सेना प्रमुख प्रतीक्षा घुलेंच्या सांगण्यावरून महिलेला मारहाण; जेसीबीच्या साहाय्याने घरही पाडले

googlenewsNext

पिंपरी : महिलेला मारहाण करून घराबाहेर काढून जेसीबीच्या साह्याने घर पाडले. तसेच महिलेच्या मुलाला देखील विटा फेकून मारत जखमी केले. युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख पदी असलेल्या महिलेच्या सांगण्यावरून घर पाडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रामनगर, बोपखेल येथे शनिवारी (दि. ८) दुपारी ही घटना घडली.    

अनिता नंदकिशोर बिलोरीये (वय ५०, रा. रामनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित भिवाल, नीलेश भिवाल, विवेक लवेरा, सनी भिवाल, प्रियंका भिवाल, सोनू लवेरा, निकिता पिल्ले, प्रतीक्षा घुले (रा. बोपखेल) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी सनी भिवाल याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी घरात आले. तुमची वडिलोपार्जित जमीन डेव्हलपमेंटला दिली आहे. त्याबाबतच्या पॉवर ऑफ ॲटर्नीवर गुपचूप सही कर. नाहीतर तुला जाळून टाकू, अशी आरोपींनी धमकी दिली. फिर्यादीने सही करण्यास नकार दिला. किचनमधील गॅस शेगडी फिर्यादीच्या अंगावर फेकून मारून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीला बळजबरीने घराच्या बाहेर काढले. आरोपींनी जेसीबी मशीनने फिर्यादीच्या घराच्या भिंती व संपूर्ण घर पाडले. फिर्यादीचा मुलगा अक्षय याने जेसीबी मशीन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्याला विटा फेकून मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

‘मला बदनाम करण्याचा प्रयत्न’

घर पाडले त्यावेळी प्रतीक्षा घुले तिथे होत्या. त्यांच्या सांगण्यावरून अन्य आरोपींनी हे भांडण करून घर पाडले, असे फिर्यादीत नमूद आहे. प्रतीक्षा घुले या युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख आहेत. यातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे प्रतीक्षा घुले यांनी सांगितले.

Web Title: Pimpri Yuvati Sena chief Pratiksha Ghule beats up a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.