तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By नितीन चौधरी | Published: May 19, 2023 04:48 PM2023-05-19T16:48:42+5:302023-05-19T16:48:53+5:30

साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला

Pimprikar in darkness for 14 hours due to technical failure Electricity supply to three and a half lakh customers interrupted | तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

googlenewsNext

पुणे : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरुवारी (दि. १८) रात्री ७ वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीसह पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

 या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला. परिणामी काही भागात नागरिकांना तब्बल १४ तास अंधारात व उकाड्यात काढावे लागले. या तांत्रिक बिघाडामुळे महापारेषणचे अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडल्याने तसेच भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे गुरुवारी (दि. १८) रात्री १० वाजेपासून पहाटे ३ वाजेपर्यंत कोथरूड, एसएनडीटी, औंध, बाणेर, शिवाजीनगर, बालेवाडी, बावधन, मॉडेल कॉलनी, पाषाण आदी भागांमध्ये एक तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करावे लागले.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये गुरुवारी (दि. १८) रात्री ७ वाजता तांत्रिक बिघाड झाला. पाहणीमध्ये तळेगाव नजिकच्या करंजविहिरे गावाजवळ अतिउच्चदाबाची एक वाहिनी तुटून दुसऱ्या वाहिनीवर पडल्याचे दिसून आले. त्यानंतर रात्रीच अदानी कंपनी आणि महापारेषणचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. परंतु, या बिघाडामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल ३९६ मेगावॅट विजेचे वहन बंद पडले होते. परिणामी पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी तसेच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर, संपूर्ण प्राधिकरण आणि आकुर्डीमधील ५० टक्के भाग असा एकूण ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.

महापारेषण व महावितरणचे सर्व वरिष्ठ अभियंता सातत्याने एकमेकांशी संपर्कात होते. एकीकडे उन्हाळ्यामुळे वाढलेली विजेची मागणी व तांत्रिक बिघाडामुळे ३९६ मेगावॅट विजेचे थांबलेले वहन या प्रतिकूल परिस्थितीत भारव्यवस्थापनाद्वारे वीजग्राहकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरु होते. यामध्ये साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला. महापारेषण व महावितरणचे उपकेंद्र टप्प्याटप्प्याने सुरु होत गेले त्याप्रमाणे ग्राहकांचा वीजपुरवठा देखील सुरळीत होत गेला. आज सकाळी ८.५५ पर्यंत पॉवर ग्रीडच्या वीजवाहिन्यांमुळे खंडित झालेल्या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

Web Title: Pimprikar in darkness for 14 hours due to technical failure Electricity supply to three and a half lakh customers interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.