आता स्वाती घेणार मोकळा श्वास...! पोटात अडलकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 13:12 IST2022-06-02T11:29:40+5:302022-06-02T13:12:56+5:30

ससून प्रशासनाची तत्परता

pin stuck in the abdomen was surgically removed of Swati netare sasoon hospital | आता स्वाती घेणार मोकळा श्वास...! पोटात अडलकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली

आता स्वाती घेणार मोकळा श्वास...! पोटात अडलकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली

पुणे : चिमुकल्या स्वातीच्या पोटात गेलेली केसांना लावण्याची पिन (क्लिप) ही गुरुवारी सकाळी शस्त्रक्रियेद्वारे ससूनमधील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या बाहेर काढली. ससून रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. पद्मसेन रनबागळे यांनी ही शस्त्रक्रिया केली. यामुळे आता स्वाती मोकळा श्वास घेणार आहे. 
  
पाषाण येथे राहणाऱ्या 6 वर्षाच्या स्वाती नेटारे या मुलीने दातात अन्नाचे काही कण अडकल्याने ते बाहेर काढण्यासाठी 19 मे रोजी या पिनद्वारे प्रयत्न करत असताना ती चुकीने पोटात गेली. सुरवातीला तिच्या पालकांना काही डॉक्टरांनी सांगितले होते की ती आपोआप बाहेर पडेल, पण तसे काही झाले नाही. त्यानंतर, काही खासगी रुग्णालयांनी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी नकार दिला. तर एका रुग्णालयाने 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च सांगितला होता. 
   
स्वातीचे वडील बाळू नेटारे हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात व महिनाकाठी त्यांना 12 तास काम करून 9 हजार रुपये मिळतात. काही दिवसांपूर्वी ते ससून रुग्णालयात उपचारासाठी आले होते मात्र, तेथे परिचारिका संप सुरू असल्याने त्यांना मनुष्यबळाअभावी दाखल केले नव्हते. दरम्यान स्वातीला मात्र पोटदुखीचा त्रास सातत्याने होत होता. 

स्वातीच्या या आरोग्य विषयक होणाऱ्या फरफटीची दखल दैनिक लोकमतने 1 जूनच्या अंकात घेत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच सारी चक्रेच फिरली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी स्वातीच्या कुटुंबियांची चौकशी करून त्यांना ससूनमध्ये शस्त्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले व ते पाळलेही. यासाठी 'उडान फाउंडेशन' च्या भाग्यश्री ठाकूर यांनी या मुलीला त्यांच्या वाहनाने तिच्या राहत्या घरातून ससून हॉस्पिटलमध्ये बुधवारी सायंकाळी घेऊन जात ऍडमिट केले. 

 गुरुवारी सकाळीच 10 च्या सुमारास स्वातीवर डॉ. पद्मसेन रनबागळे यांनी शस्त्रक्रिया करून ती पोटात अडकलेली पिन बाहेर काढली. आता स्वातीची तब्येत स्थिर असून लवकरच तिला सुटी होणार आहे. याबद्दल नेटारे कुटुंबीयांनी दैनिक लोकमत सह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे व सर्व स्टाफचे आभार व्यक्त केले.

Read in English

Web Title: pin stuck in the abdomen was surgically removed of Swati netare sasoon hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.